Ladki Bahin Yojan: राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर जमा झाला. मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. केवळ ई-केवायसीच नाही, तर उत्पन्नाच्या निकषात न बसल्यामुळे अनेक महिलांचे पैसे रोखले गेल्याची बाब आता समोर आली आहे. योजनेच्या सुरुवातीला अनेक महिलांनी अपात्र असतानाही लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आले होते. हे रोखण्यासाठी सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण आहे आणि ज्या पात्रतेच्या सर्व निकषांत बसतात, त्यांनाच डिसेंबरचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना ई-केवायसी असूनही अपात्र ठरवण्यात आले आहे. पैसे न मिळण्याची प्रमुख कारणे: उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त असणे. अपूर्ण माहिती: ई-केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांच्या उत्पन्नाची चुकीची माहिती देणे. तपासणीत अपात्रता: ३१ डिसेंबरच्या मुदतीनंतर झालेल्या पडताळणीत निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. “ज्या महिला पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळालेला नाही, त्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. मात्र, उत्पन्नाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही,” असे सूत्रांकडून समजते. जानेवारीच्या हप्त्याकडे लक्ष – विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. डिसेंबरचा हप्ता मिळाला नसल्याने राज्यातील महिलांमध्ये नाराजी असली, तरी आता सरकार जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.