Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो लाभार्थी महिलांसाठी (Ladki Bahin Yojana) महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ई-केवायसीची (Ladki Bahin Yojana) प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली होती. सुरुवातीला नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती ३१ डिसेंबर २०२५, नंतर ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली होती. आता महिलांकडून आलेल्या तक्रारी, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेदरम्यान येणारे अडथळे लक्षात घेता ही मुदत (Ladki Bahin Yojana) पुन्हा ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Ladki bahin yojana महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पोर्टल वारंवार बंद राहणे, तांत्रिक समस्या आणि काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचा योजनेचा लाभ थांबला होता. अशा सर्व तक्रारी आणि सूचनांचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तटकरे यांनी स्पष्ट केले की, ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. शासनाचे आवाहन राज्य शासनाने यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे किंवा त्यात काही तांत्रिक चुका झाल्या आहेत, त्यांनी या अतिरिक्त कालावधीत तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहिना १,५०० रुपये सन्मान निधी जमा केला जातो. ही योजना राज्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेचा मोठा प्रचार केला होता. निवडणुकीत महायुतीला या योजनेचा फायदा झाल्याचे मानले जाते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने महिलांना आश्वासन दिले होते की, सत्तेवर आल्यास सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात येईल. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दीड वर्ष उलटले तरी अद्याप या निधीमध्ये वाढ करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सन्मान निधी किती रुपयांपर्यंत वाढेल याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. या मुदतवाढीमुळे ज्यांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झाली नाही किंवा चुका झाल्या आहेत, अशा हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो. सर्व लाडक्या बहिणींनी ३० एप्रिल २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.