धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पिंपळगाव बेलगाव परिसरात अलीकडील अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला आलेल्या महापुराने मोठा कहर केला. नदीपात्र बदलल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडला आहे. या पार्श्वभूमीवर बोरगाव ग्रामस्थ बोरगाव व सुसंगत प्रतिष्ठान, बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक मदत वाटप करण्यात आले. पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी कुटुंबांना धान्य,कपडे,साड्या, ब्लॅंकेट तसेच दैनंदिन वापरातील आवश्यक साहित्य देण्यात आले. या मदतकार्याचे आयोजन सुसंगत प्रतिष्ठान परिवारातील सदस्यांच्या परिश्रमातून करण्यात आले असून, पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आशेचा किरण उमटविणारा हा एक संवेदनशील आणि विधायक उपक्रम ठरला. पिंपळगाव बेलगाव सरपंच व पोलिस पाटील मॅडम कविता गव्हाणे यांनी मदत वाटप करण्यासाठी विशेष सहकार्य केले. या मदतकार्यामध्ये संतोष डांगे, अधिक पाटील, संदीपराव पाटील सावकर, प्रा. प्रदीप गावडे, रणजीत शिंदे, सचिन सलगर, सागर शिंदे, निलेश भालेकर, जयंत वाटेगावकर,गजानन कोगनुरे, संदीप माने, अल्ताफ औठी, दादासो झेंडे, प्रदीप पाटील, मयुर जाधव, रफीक जमादार, नागराज चांदकोटी व सुसंगत प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी बोरगाव ग्रामस्थ व परिसरातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर सुसंगत प्रतिष्ठानतर्फे सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.