इक्विटी म्युच्युअल फंडांना ‘ओहोटी’; फेब्रुवारीत 26 टक्क्यांनी कमी झाली गुंतवणूक

नवी दिल्ली – सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. परिस्थिती कधी सुधारेल या संदर्भात भाष्य करता येणे अवघड आहे. अशा परिस्थितीत इक्विटी म्युच्युअल फंडात फेब्रुवारी महिन्यात झालेली गुंतवणूक 26 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 29,303 कोटी रुपये इतकी झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप संबंधातील इक्विटी म्युच्युअल फंड योजनामधील गुंतवणुकीवर बराच परिणाम झाला आहे.
सलग दुसर्या महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कमी झाली आहे. जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 39,688 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. डिसेंबर महिन्यात 41,156 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर एकूण म्युच्युअल फंडात मात्र सलग 47 व्या महिन्यात गुंतवणूक वाढली आहे.
या आकडेवारीवरून असे दिसून येते की, मिडकॅप संदर्भातील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कमी होऊन 3,406 कोटी रुपये झाली आहे. तर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी होऊन 3,722 कोटी रुपये झाली आहे. जानेवारी महिन्यात मिडकॅप मध्ये 5,147 कोटी रुपयांची तर मिडकॅपमध्ये 5,720 कोटी रुपयाच गुंतवणूक झाली होती.
लार्ज कॅप मधील म्युच्युअल फंडातही गुंतवणूक कमी झाली आहे. लार्ज कॅप मध्ये जानेवारी महिन्यात 3,063 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. फेब्रुवारी महिन्यात ती कमी होऊन 2,866 कोटी रुपये इतकी झाली आहे. तर थेमॅटिक फंडात गुंतवणूक वाढून 5,711 कोटी आणि फ्लेक्सिकॅप फंडात गुंतवणूक वाढून 5,104 कोटी रुपये झाली आहे.
विशेष म्हणजे सोन्याचे दर वाढत असूनही गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूक कमी होऊन 1,980 कोटी रुपये झाली आहे. जानेवारी महिन्यात या फंडात 3,751 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
कर्जरोख्या संदर्भातील म्युच्युअल फंडातून 6,525 कोटी रुपयांची गुंतवणूक परत गेली आहे. जानेवारी महिन्यात या फंडात 1.28 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
व्यवस्थापनाखालील मालमत्ता कमी
जानेवारी महिन्यात एकूण म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 1.87 लाख कोटी रुपये होती. तर फेब्रुवारी महिन्यात ती कमी होऊन केवळ 40 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. यामुळे म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता फेब्रुवारी महिन्यात कमी होऊन 64.53 लाख कोटी रुपये झाली आहे. जानेवारी महिन्यात ही मालमत्ता 67.25 लाख कोटी रुपये होती.




