Equity mutual funds: भूराजकीय तनाव आणि व्यापार युद्धामुळे शेअर बाजारातील वातावरण कमालीचे अनिश्चित होते. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक सलग दुसर्या महिन्यात कमी होऊन 24,028 कोटी रुपये इतकी झाली आहे. डिसेंबर महिन्यात 28,054 कोटी रुपयाची, नोव्हेंबर महिन्यात 29,911 कोटी रुपयांची तर ऑक्टोबर महिन्यात 24,690 कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडात झाली होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात झालेली गुंतवणूक 14 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र आता अमेरिकेबरोबर व्यापार करार झाल्यानंतर भारतीय रुपयाच्या मूल्यात सुधारणा होत आहे. त्याचबरोबर शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात कमी झाली असली तरी जानेवारीअखेर म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता वाढून 81.01 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ही रक्कम 80.23 लाख कोटी रुपये होती. डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंडातून साधारणपणे 66,591 कोटी रुपये काढून घेतले गेले होते. मात्र जानेवारी महिन्यामध्ये म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये 1.56 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जानेवारी महिन्यात फ्लेक्सी कॅप फंडात 7,672 कोटी रुपयाची, मिडकॅप फंडात 3,185 कोटी रुपयाची, लार्ज अॅण्ड मिडकॅप फंडात 3,182 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. लार्ज कॅप फंडात 2,005 कोटी रुपयाची, स्मॉल कॅप फंडात 2,942 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली. मात्र इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम मधून 593 कोटी रुपये काढून घेण्यात आले. डेट म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 74,827 कोटी रुपये या विक्रमी पातळीवर गेली आहे. डिसेंबर महिन्यात या फंडातून 1.32 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली गेली होती. हेही वाचा : 20 फेब्रुवारीपासून बदलणार तुमचे सोशल मीडिया; AI फोटो, व्हिडीओ वापरणाऱ्यांसाठी आले कडक नियम