Pune News : युवक काँग्रेसचा एल्गार! मतदान चोरी, बेरोजगारी आणि अन्यायाविरुद्ध सरकारविरोधात मशाल मोर्चा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन मतदान चोरी बंद करा, तरुणांना नोकरी द्या, लोकशाही वाचवा, अशा आक्रमक घोषणा देत रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ विश्वजीत कदम, प्रदेश प्रभारी अजय चिकारा, युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, माजी मंत्री सतेज पाटील, अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, मीडिया विभागप्रमुख व युवक सरचिटणीस अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश अबनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला, तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता तरुणांच्या हातून उठलेली ज्वाला आहे, जी भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत.
मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल, असे शिवराज मोरे यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाहीची हत्या, मतदान चोरी आणि बेरोजगारीचा अन्यायाविरुद्धचा लढा आता अधिक तीव्र करू. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा मशालधारी योद्धा बनून सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा देईल, असा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे.





