पुणे जिल्हा | राजगुरूनगरात चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरीयाची साथ

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – शहरात साथीच्या आजारा सोबतच चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली असून खासगी दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. तर नगरपरिषदेच्या माध्यमातून किंचितशी उपाययोजना केली जात आहे.
राजगुरूनगर शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत रास्ता आणि गटारांची कामे सुरु असल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी साठून राहत असल्याने त्यावर डासांची उत्पत्ती होत आहे.
त्याचे प्रमाण अधिक आहे. सांडपाणी व्यवस्था नीट नसल्याने जागोजागी पाणी साठलेले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून किंचितशी उपाययोजना केली जात आहे.
व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, कणकण या आजाराची साथ असून खासगी दवाखाने रुग्णसंख्येने भरले आहेत.
राजगुरुनगर येथील प्राथमिक केंद्र सलाईनवर होते. तेथे आवश्यक सेवा सुविधा नव्हत्या; मात्र गुरुवार (दि. 12) पासून राजगुरूनगर शहरात बॉश कंपनीच्या सीएसआर फंडातून 5 कोटी रुपयांची इमारत आणि अंतर्गत आवश्यक सुविधा देणार्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवार (दि. 13) पासून रुग्णसेवा सुरु झाली आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातल्याने येथे उपचारासाठी रुग्णांची गर्दी झाली आहे.
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या माध्यमातून साथीचे आजार पसरून नये यासाठी मागील आठ दहा दिवसांपासून औषध फवारणी सुरू आहे.
साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली हात आहे. नागरिकांनी डेंग्यूचा आजार टाळण्यासाठी पाणी साठवू नये एक दिवस कोरडा दिवस पाळावा. – अजिंक्य रणदिवे , मुख्याधिकारी राजगुरूनगर नगरपरिषद





