पुणे – पर्यावरणविषयक मूल्यमापन करणाऱ्या देशभरातील सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळांचे विश्लेषण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (सीपीसीबी) करण्यात आले आहे. या विश्लेषणांतर्गत प्रयोगशाळांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता याबाबत विश्लेषण करून मानांकन दिले जाणार आहे. ही प्रक्रिया मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.
विविध पर्यावरणीय घटकांशी निगडित संशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी देशात स्वतंत्र पर्यावरण प्रयोगशाळांची (एन्व्हायरमेंट लॅब) उभारणी केली आहे. या प्रयोगशाळा उभारणीसाठी “सीपीसीबी’कडून परवानगी देण्यात येते. तसेच, ठराविक कालावधीनंतर त्यांचा कार्याहवाल आणि गुणात्मक पाहणी केली जाते.
मंडळाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या 33 व्या विश्लेषणांतर्गत देशभरातील 145 खासगी तसेच सरकारी प्रयोगशाळांचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये हवा आणि पाण्यामध्ये मिसळलेल्या विविध धातूंचे मूल्यमापन करण्याची प्रयोगशाळांमधील क्षमता, चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची मजबूती आणि प्रयोगशाळांमधील तज्ज्ञ मनुष्यबळ अशा विविध बाबींचा विचार समाविष्ट आहे.
प्रयोगशाळांचा विश्लेषण अहवाल मंडळाकडे प्राप्त झाला असून, सध्या या अहवालांचा अभ्यास करून त्यांना मानांकन देण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर हे मानांकन संबंधीत प्रयोगशाळांकडे पाठविण्यात येतील. ही प्रक्रिया मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. या प्रक्रियेमुळे प्रयोगशाळांना त्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि गुणवत्तावृद्धीविषयक गरजांचे मूल्यमापन करणे सोयीचे ठरणार आहे, अशी अपेक्षा मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.