Pune District : भोर-राजगडमध्ये पर्यावरणीय संकट गडद
Pune District : तर दुसऱ्या छायाचित्रात ते हातामध्ये प्लास्टिकचा तुकडा घेऊन खाताना दिसत आहे. या निरागस चेहऱ्यामागे मात्र जंगलातील आटलेले पाणवठे, वाढलेला प्लास्टिक कचरा आणि वन्यजीवांच्या जगण्यासाठी सुरू असलेली धडपड स्पष्टपणे दिसून येत आहे.

नसरापूर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भोर-राजगड तालुका एकेकाळी थंड हवामान, हिरवीगार जंगले, बारमाही झरे आणि नैसर्गिक संपन्नतेसाठी ओळखला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत वाढती वृक्षतोड, डोंगर उत्खनन, बेसुमार विकासकामांमुळे या परिसराचे नैसर्गिक संतुलन ढासळताना दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आता केवळ नागरिकच नव्हे तर वन्यजीवही त्रस्त झाले असून जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने प्राणी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत.
नसरापूर परिसरातील शिवगंगा नदीकाठी पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष विशाल शिंदे हे फिरत असताना एका चिमुकल्या माकडाचे अत्यंत हृदयस्पर्शी छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले. एका छायाचित्रात हे माकड तहान भागवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताना दिसत आहे, तर दुसऱ्या छायाचित्रात ते हातामध्ये प्लास्टिकचा तुकडा घेऊन खाताना दिसत आहे. या निरागस चेहऱ्यामागे मात्र जंगलातील आटलेले पाणवठे, वाढलेला प्लास्टिक कचरा आणि वन्यजीवांच्या जगण्यासाठी सुरू असलेली धडपड स्पष्टपणे दिसून येत आहे.
भोर-राजगड परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली जंगलतोड आणि डोंगर फोडून केले जाणारे उत्खनन यामुळे अनेक नैसर्गिक झरे, ओढे आणि जलस्रोत कायमचे नष्ट होत आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या देशी झाडांची कत्तल करून प्लॉटिंग आणि काँक्रीटची बांधकामे केली जात आहेत. परिणामी माकडे, हरिण, रानडुक्कर आणि इतर वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त होत आहेत. जंगलातील पाणी आणि अन्न कमी झाल्यामुळे वन्यजीव गावांच्या दिशेने येऊ लागले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही वर्षांपूर्वी भोर-राजगड तालुक्यात इतकी तीव्र उष्णता कधीच जाणवत नव्हती. मात्र आता सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्येही विदर्भासारखे तापमान जाणवू लागले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, अशक्तपणा आणि विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. पर्यावरणप्रेमींनी यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास जबाबदार असल्याचे सांगितले.
आपण फक्त झाडे तोडतो; पण ती पुन्हा लावून जगवण्याचा विचार करत नाही. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांकडून वृक्षारोपण केले जाते; मात्र ती झाडे पुढे जगतात का, हे कोणी पाहत नाही. प्रत्येकाने पावसाळ्यात झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
– विशाल शिंदेउत्खनन, जंगलतोड आणि वाढती प्लॉटिंग यामुळे वन्यजीवांची नैसर्गिक घरे उद्ध्वस्त होत आहेत. जंगल कमी झाल्यावर प्राणी गावात येणारच. आज माकड पाण्यासाठी बाटलीकडे वळत आहे आणि प्लास्टिक खात आहे, ही अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे.
– अनिल कानसकर, ज्येष्ठ सर्प अभ्यासक
हेही वाचा : Pune District : भीमाशंकरच्या अस्मितेसाठी तालुका एकवटला; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन





