महाबळेश्वरला “प्लॉग रन’द्वारे पर्यावरण दिन

पाचगणी – प्लॅस्टिक निर्मूलन आणि घातक प्रदुषणावर मात करण्यासाठी दि. 5 जून रोजी जगभरात साजरा केला जाणारा पर्यावरण दिन (वर्ष 49 वे) यंदाही महाबळेश्वरात मोठ्या उत्साहाने झाला. या वर्षी याच दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद व हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण व मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अंतर्गत प्लॉग रनचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामध्ये शहरातील एव्हरशाईन रिसॉर्ट, हॉटेल गौतम, अंजुमन हायस्कूल, एम.ई.एस. हायस्कूल यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. प्लॉग रन दरम्यान एव्हरशाईन रिसॉर्टपासून हॉटेल गौतम मार्गे विल्सन पॉईंट पर्यंतच्या परिसरातील एकूण 132.48 किलो सुका कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर हिलदारी अभियानांतर्गत शहरात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, मै हू गांधी – फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ट्रॅश हंट यांच्यातील विजेत्यांचा बक्षिस समारंभ शेठ गंगाधर माखरीया हायस्कूल येथे झाला.
प्रारंभी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी पर्यावरण दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमासाठी गिरीस्थान नगरपरिषदेचे बबन जाधव, रोटरी क्लबच्या स्वाती भांगडिया, महाबळेश्वर पत्रकार संघाचे शरद झावरे, प्रेषित गांधी, सचिन शिर्के, संदीप देवकुळे, संजय चोरगे, शेठ गंगाधर माखारीया हायस्कूलचे प्राचार्य राजेंद्र चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
बक्षिस वितरण प्रसंगी बबन जाधव यांनी हिलदारीने गेल्या दोन वर्षात शहरात राबविलेल्या घन कचरा व्यवस्थापनाच्या कामाचा दिसणारा प्रभाव व त्याचे सकारात्मक परिणाम याबाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच स्वाती भांगडिया यांनी हिलदारीमार्फत राबविण्यात आलेल्या ट्रॅश हंट व मै हू गांधी – फॅन्सी ड्रेस स्पर्धा या दोन अनोख्या संकल्पनांबाबत आनंद व्यक्त करत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे प्लॅस्टिक निर्मुलनाचा विषय खूप चांगल्या प्रकारे सामान्य माणसांमध्ये रुजेल असा विश्वास व्यक्त केला. झावरे यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी हिलदारी अभियानाअंतर्गत विविध भागधारकांना एकत्र आणून केलेल्या एकत्रित प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असे सांगितले.
या उपक्रमासाठी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले असून मुख्य लिपीक आबा ढोबळे, वैभव साळुंखे, आकाश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी, राम भोसले, निशांत कदम, फैयाज वारुणकर, खाकसरअली पटेल, गौरी चव्हाण, अमृता जाधव, प्रतिमा बोडरे, आरती मोरे यांनी परिश्रम घेतले.





