अहमदनगर – जायकवाडीत पुरेसे पाणी, मग जिल्ह्यातून पाणी सोडू नका

कोपरगाव – चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीचे 42 टक्केच पाऊस झाला असून जायकवाडी पाणलोट क्षेत्रात सरासरीचे 84 टक्के पाऊस झाला आहे. जायकवाडी धरणाचा पाणी साठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांचे लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती असून जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतांना समन्यायी पाणी वाटप कायद्याने नगर- नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नका, या मागणीचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विजय घोगरे यांना दिले.
जायकवाडी धरणात दि.25 जून 2023 रोजी 27.24 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर पावसाळ्यात 15 ऑक्टोबर 2023पर्यंत जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून 24.34 टीएमसी पाणी वाहून गेले आहे. त्याची एकूण टक्केवारी 32.45 होत असून एकूण 59.69 टक्के पाणी साठा आज रोजी जायकवाडी धरणात उपलब्ध आहे.जायकवाडी धरणाची पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता 14 हजार स्केकिमी फ्रि कॅचमेंट मधून कोणतेही पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. याबाबत आपण कार्यवाही करणे आवश्यक आहे. जायकवाडी धरणातील पाणी साठ्यातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत पाणी उपसा होतो व आजही सुरु आहे. त्याचा कुठेही पाणी वापर दिसून येत नाही.
नवीन समितीचा अहवाल आलेला नसल्याने जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी दि. 17 फेब्रुवारी 2020 रोजी जाहीर केलेल्या आधार सामुग्रीच्या आधारे जायकवाडी धरण्यात समन्यायी पाणी वाटप कायद्याने पाणी सोडण्याबाबत विचार केल्यास नगर नाशिक धरणांचे लाभक्षेत्रावर काही प्रमाणात अन्याय दूर होण्यास मदत होणार असून एकूण परिस्थितीचा अभ्यास करून दुष्काळी परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू नका असे दिलेल्या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे. यावेळी काकासाहेब जावळे, सोमनाथ चांदगुडे, ज्ञानदेव मांजरे, आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, बाळासाहेब बारहाते, अशोकराव काळे, संजय आगवण, राजेंद्र खिलारी, दिलीपराव बोरनारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे आदी उपस्थित होते.





