लंडन, नवी दिल्ली – भारतीय प्रवाशांना लसीकरण झाले असले तरी 10 दिवसांचे सक्तीचे विलगीकरण करण्यास भाग पाडणाऱ्या नव्या प्रवास आचार संहितेत भारताच्या आक्रमक विरोधामुळे बदल करण्यात आला. आता कोविशिल्ड या लसीला अधिकृत लस म्हणून मान्यता देण्यात आली. मात्र त्यासाठी इंग्लंडला येण्यापूर्वी किमान 14 दिवस आधी लसीकरण पूर्ण झाले करणे आवश्यक करण्यात आले आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड या लसीला अधिकृत लसींच्या यादीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यावर भारताकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला होता. या अवमानकारक धोरणामुळे इंग्लंडला येणाऱ्या भारतीय प्रवाशांची अडचण होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी हा विषय इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे उपस्थित केला होता. हा तिढा सोडवण्यासाठी काही तरी ठोस आश्वासन दिले पाहिजे, असे सांगण्यात आले आहे, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मंगळवारी सांगितले होते.
इंग्लंडचे नवे प्रवासी धोरण चार ऑक्टोबर 2021 पासून अंमलात आणण्यात येणार आहे. इंग्लंडने सध्या लाल, अंबर आणि हिरव्या अशा तीन गटात देशांची वर्गवारी केली आहे. भारताचा समावेश सध्या अंबर रंगाच्या गटात करण्यात आला आहे.
ज्यावेळी व्यवहार्य ठरेल त्यावेळी पण लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय प्रवास खुला करण्यास इंग्लंड बांधिल आहे. सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करून आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्यासाठी प्रवासी आचार संहिता हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया भारतामधील इंग्लंडच्या राजदुतांनी मंगळवारी दिली होती. भारत सरकार बरोबर लसीकरण प्रक्रियेच्या मान्यतेसंदर्भात आम्ही संपर्कात असल्याचे इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तत्याने लंडनमध्ये मंगळवारी स्पष्ट केले होते.
कोविशिल्ड ही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली लस आहे. मात्र, ही लस मूलत: ऍस्ट्राझिन्का ऑक्सफर्ड यांनी विकसित केली आहे. भारतातील लसीकरणात या लसीचा वापर 88 टक्के इतका केला जातो.