Unofficial Test : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी रंगतदार स्थितीत, दुसऱ्या दिवशी एकूण 15 गडी बाद….

India A Women vs Australia A Women Unofficial Test Day 2 Stumps : भारतीय महिला अ संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला अ संघ यांच्यात गोल्ड कोस्ट मैदानावर खेळल्या जात असलेल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ अतिशय रोमांचक झाला. दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले, कारण सामन्यात एकूण 15 विकेट्स पडल्या.
भारतीय संघाचा पहिला डाव 184 धावांवर संपला, तर ऑस्ट्रेलियन महिला अ संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 164 धावा केल्या होत्या आणि त्यांच्याकडे एकूण 192 धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाकडून केट पीटरसनने 5 विकेट घेतल्या, तर भारतासाठी कर्णधार मिनू मणीने पुन्हा एकदा गोलंदाजीत चमकदार कामगिरी करताना 5 बळी घेतले.
TEST.Stumps Day 2. Australia A -164/7, Lead by 192 Runs. https://t.co/rXFNsPuL03 #AUSAvINDA
— BCCI Women (@BCCIWomen) August 23, 2024
भारताचा पहिला डाव केवळ 184 धावांवर संपुष्टात…
या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन अ संघाचा पहिला डाव 212 धावांवर आटोपला होता. तर प्रत्युत्तरात भारतीय महिला अ संघानेही 2 गडी गमावून 100 धावा केल्या होत्या. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाकडून केवळ चमकदार गोलंदाजीच दिसून आली नाही तर त्यांनी भारतीय अ संघाचा डाव अवघ्या 184 धावांवर गुंडाळण्याबरोबरच पहिल्या डावाच्या आधारे 28 धावांची महत्त्वपूर्ण आघाडीही मिळवली.
भारतीय महिला अ संघाच्या पहिल्या डावातील फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर श्वेता सेहरावतने 40 धावांची, तेजल हसबनीसने 32 धावांची, शुभा सतीशने 22 धावांची तर सायली सटघारेने 21 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियन महिला अ संघाच्या या डावात केट पीटरसनने 5 तर मॅटलॉन ब्राउन, निकोला हॅनकॉक, चार्ली नॉट आणि लिली मिल्स यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
कर्णधार मिनूची दुसऱ्या डावातही शानदार गोलंदाजी…
भारतीय डाव लवकर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाला दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण उलट चित्र पाहायला मिळाले. भारतीय महिला अ संघाची कर्णधार मिनू मणी हिनेही दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत 20 षटकात 47 धावा देताना आतापर्यंत 5 बळी घेतले आहेत. याशिवाय सायली सातघरे आणि प्रिया मिश्रानेही प्रत्येकी 1 बळी घेतला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन महिला अ संघाकडून मॅडी डार्क 54 तर लिली मिल्स 3 धावांसह खेळत होती.





