ENG vs SL 2nd Test : लॉर्ड्सवर ‘बॅक-टू-बॅक’ सेंच्युरीनंतर जो रूटने लगावले खास ‘दुहेरी शतक’, राहुल द्रविडचा विक्रम धोक्यात…

ENG vs SL 2nd Test : लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावून जो रूटने नवा इतिहास रचला. रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले आणि यासह इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला. रूटने ॲलिस्टर कुकचा 33 शतकांचा विक्रम मोडला. या शतकाच्या जोरावर रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 50 शतकेही पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारा रूट आता जगातील 9वा फलंदाज ठरला आहे.
रुटने श्रीलंकेविरूध्दच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 257 धावा करण्यात यशस्वी ठरला. अशाप्रकारे इंग्लंड संघाने श्रीलंकेला विजयासाठी 483 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचा निशाण मदुष्का आणि दिमुथ करुणारत्ने यांनी डावाला सुरुवात केली पण गस ऍटकिन्सनने 8व्या षटकातच पहिली विकेट घेतली. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ॲटकिन्सनने निशान मदुष्काला जो रूटकरवी झेलबाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर 14व्या षटकात ऑली स्टोन याने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. यावेळी पुन्हा एकदा जो रूटने झेल घेतला. यासह जो रूटने क्षेत्ररक्षणात नवा विक्रम केला.
🔥 200 CATCHES IN TEST CRICKET! 🔥
The records just keep on coming for Joe Root… pic.twitter.com/voS6MpnK8b
— England Cricket (@englandcricket) August 31, 2024
रुटने क्षेत्ररक्षणात रचला नवा विक्रम
वास्तविक, दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात जो रूटने 2 झेल घेत कसोटी क्रिकेटमधील 200 झेल पूर्ण केले आहेत. कसोटीत 200 झेल घेणारा तो पहिला इंग्लिश क्षेत्ररक्षक आणि जगातील केवळ चौथा क्षेत्ररक्षक ठरला आहे. रूटच्या आधी राहुल द्रविड, महेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी हे स्थान गाठले होते. आता रुट कसोटीत सर्वाधिक झेल घेण्याच्या विक्रमापासून केवळ 11 झेल दूर आहे. तसेच महेला जयवर्धने याला पिछाडीवर टाकण्यासाठी रूट आणखी 6 झेलची आवश्यकता आहे. तो या कसोटीतच हा विक्रम करू शकतो. कारण श्रीलंकेने तिसऱ्या दिवसाचा (शनिवार,31 आॅगस्ट) खेळ संपला तेव्हा 2 बाद 53 धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी आणखी 430 धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला विजयासाठी आठ विकेटची गरज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक…
210 – राहुल द्रविड (301 डाव)
205 – महेला जयवर्धने (270 डाव)
200* – जो रूट (275 डाव)
200 – जॅक कॅलिस (315 डाव)
196 – रिकी पाँटिंग (328 डाव)





