ENG vs SL 2nd Test : लॉर्ड्स कसोटीतही श्रीलंका पराभूत, इंग्लंडची मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी…

ENG vs SL 2nd Test :- क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला आहे. 483 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ चौथ्या दिवशी केवळ 292 धावाच करू शकला. या सामन्यात गस ऍटकिन्सनने पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर शेवटच्या डावात 5 बळी घेतले. लॉर्ड्सवर ही कामगिरी करणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी टोनी ग्रेग, इयान बोथम आणि भारताच्या विनू मांकड यांनी ही कामगिरी केली आहे.
इंग्लंडकडून जो रूटने दोन्ही डावात शतके झळकावली. तसेच तो इंग्लंडकडून सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि दिमुथ करुणारत्ने यांनी अर्धशतके झळकावली.
Another five-star day for Gus Atkinson as England seal the series win against Sri Lanka with a game to spare! https://t.co/yd8lOt501f | #ENGvSL pic.twitter.com/sWDqycKDdG
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 1, 2024
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 427 धावा केल्या होत्या प्रत्तुत्तरात श्रीलंकेला केवळ 196 धावा करता आल्या, त्यामुळे इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 251 धावा केल्या, त्यामुळे श्रीलंकेला 483 धावांचे लक्ष्य मिळाले. श्रीलंकेने दुसऱ्या डावात झुंज दाखवली, पण संघ 292 धावांत आटोपला.
लॉर्ड्स कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. संघाने पहिली कसोटी 5 गडी राखून जिंकली. मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी लंडनच्या ओव्हल मैदानावर 6 सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपदात इंग्लंड चौथा
श्रीलंकेचा 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभव करूनही, इंग्लंड जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्लूटीसी) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने 15 पैकी 8 कसोटी जिंकल्या आणि फक्त 6 गमावल्या. एक सामना अनिर्णित राहिला. स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडचे आतापर्यंत 19 गुण वजा झाले आहेत, त्यामुळे संघाचे 81 गुण झाले आहेत. इंग्लंडने 15 सामने खेळले, म्हणजे एका विजयाच्या 12 गुणांसह, संघ 180 गुणांपर्यंत पोहोचू शकला असता. मात्र त्याचे केवळ 81 गुण आहेत. यानुसार, संघ 45% गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत पहिल्या क्रमांकावर आहे.





