UPI सारखी ऊर्जा क्रांती: प्रत्येक घर बनेल सौर ऊर्जागृह!

बंगळुरू – युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसने भारतातील वित्तीय उत्पादन क्षेत्रात जशी अमुलाग्र क्रांती घडवून आणली आहे, तशाच प्रकारची क्रांति आता भारतातील ऊर्जा क्षेत्रात होणार आहे. प्रत्येक घर सौर ऊर्जा पॅनलमुळे ऊर्जा निर्मिती केंद्र होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे प्रत्येक घरात विजेची साठवणूक होणार आहे. यामुळे प्रत्येक घर ऊर्जा निर्मिती, पुरवठादार आणि वापर करणारे केंद्र होणार आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात मोठी क्रांती होणार असल्याचे मत इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक आणि यूपीआय विकसक नंदन निलेकणी यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय भविष्याचा वेध घेणार्या एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी सांगितले की, घरावर सोलर पॅनल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे प्रत्येक घर ऊर्जा निर्माता आणि वापरकर्ता होणार आहे. यामुळे नवे कोट्यवधी उद्योजक तयार होणार आहेत. अर्थात यामुळे परंपरागत ऊर्जा निर्मिती आणि वितरण बदलणार आहे. ग्रीड चे महत्व वेगळ्या पद्धतीने कमी होणार आहे. ऊर्जेचा वापर वाढल्यानंतर अर्थातच त्याला त्यामुळे विकास होणार आहे.
परंपरागत ऊर्जा वापरात बदल
ते म्हणाले की आतापर्यंत भारतीय लोक ऊर्जा ही द्रव्य किंवा घनस्वरूपात म्हणजे एलपीजी सिलेंडर आणि कोळशाच्या स्वरूपात वापरत होते. मात्र वीज ग्रीडमधूनच घेतली जात असे. मात्र आता घरातच वीज निर्माण होऊन ती साठवली जाणार असल्यामुळे ऊर्जा क्षेत्राचे विकेंद्रीकरण होणार आहे. अनेक घरात सोलर एनर्जी आणि ईव्ही बॅटरी असल्यामुळे प्रत्येक घर ऊर्जेचा निर्माता, वापर कर्ता आणि खरेदी कर्ताही होणार आहे.
यूपीआयप्रमाणे ऊर्जेची खरेदी विक्री
युपीआयने पेमेंट देणे आणि घेण्यात अमुलाग्र क्रांती केली आहे. अशा प्रकारे ऊर्जा क्षेत्रात आता ऊर्जा खरेदी करणे आणि विक्री करणे होणार आहे. ही व्यवस्था सोपी असल्यामुळे भारतीय ते वेगात आत्मसात करतील. ऊर्जा निर्मितीच्या आणि वापराच्या विकेंद्रीकरणामुळे देशात अब्जावधी कुटीर ऊर्जा निर्माण होतील आणि ऊर्जेच्या वापरामुळे अर्थव्यवस्था वेगाने वाढेल.





