प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्याच्या जलसंपदा विभागाच्या कालवा, नद्या आणि धरण क्षेत्राच्या सीमारेषांलगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बंगल्यांचे, घरांचे तसेच हॉटेल-रेस्टॉरंटचे बांधकाम झाले असून त्यांचे सांडपाणी थेट धरणात मिसळत आहे. यामुळे जलस्रोत दूषित होत आहेत. यावर उपाय म्हणून जलसंपदा विभागाने ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सोमवारी महापालिकेत झालेल्या जलवापराच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.विखे पाटील म्हणाले, खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट्समधून थेट सांडपाणी धरणात सोडले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे. त्यामुळे धरण आणि कालवा क्षेत्रातील अतिक्रमण तातडीने हटवण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वप्रथम ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर जलसंधारण विभागाकडून अचूक सीमारेषा मोजण्यात येतील आणि महानगर पालिका तसेच संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई हाती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.