पूर्व लडाखमधील भागात चिनी सैनिकांचे अतिक्रमण? गृहमंत्र्यांनी खुलासा करण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील एका भागात चिनी सैनिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या संबंधात गृहमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. त्या भागातील भारतीय मेंढपाळांना त्यांची जनावरे चरण्यापासून चिनी सैनिकांनी रोखले असून त्यावेळी त्यांच्यात जोरदार संघर्ष उडाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चिनचे सैनिक भारतीय गुराख्यांचा छळ करीत असून त्या संबंधात गृहमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
एका निवेदनात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मे २०२० पासून अशा किती घटना घडल्या आहेत आणि अशा चकमकीत भारतीय गुराख्यांना काही दुखापत झाली आहे का, अशी विचारणा केली. गेल्या महिन्यात पूर्व लडाखमधील चुशुलच्या दक्षिणेकडील भागात चिनी सैनिकांनी मेंढपाळांना व गुराख्यांना रोखले होते. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता.
या घटेनवर प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की दोन्ही बाजूंना पारंपरिक चराई क्षेत्राबद्दल माहिती आहे, आणि तेथे झालेल्या संघर्षाच्या विषयाची हाताळणी करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे.
सरकारची ही प्रतिक्रीया जयराम रमेश यांनी अमान्य केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १८ फेऱ्यांच्या लष्करी चर्चेनंतरही गेल्या चार वर्षांपासून पूर्व लडाखमधील २००० चौरस किलोमीटरच्या भूभागात चीनने आमच्या सैन्याला आणि गुराख्यांना प्रवेश करण्यापासून रोखले आहे. त्यावर तोडगा काढण्यात आमच्या सरकारला अपयश आले आहे. भारतीय गुराख्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनीच या संबंधात अधिकृत खुलासा केला पाहिजे. सीमावर्ती भागात शांतता असल्याशिवाय चीनसोबतचे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे भारताचे म्हणणे आहे.





