पुणे – रेल्वे मार्गासह गाडी आणि स्थानकावर जखमी झालेल्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सर्कुलटिंग परिसराजवळ (सिटी साइड) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या कक्षाचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे चेअरमन डॉ. पी. जी. ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विभागाच्या रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. के. संजीव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रुबी हॉल क्लिनिकचे बेहराम खोदाइजी, डॉ. प्रसाद मुगळीकर यासह रेल्वे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. ट्रेनमधून खाली पडणे किंवा अन्य वैद्यकीय आपत्तीत तात्काळ उपचार या कक्षातील डॉक्टरांच्या मदतीने देण्यात येईल. या कक्षामध्ये ईसीजी, डिफिब्रिलेटर, पुनरुत्थान सुविधा, नेब्युलायझर आदी सुविधा आहेत. तसेच स्वतंत्र मेडिकल असून, आपत्कालीन परिस्थितीत लागणारी सर्व औषधे येथे उपलब्ध होतील. रूबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. आपत्कालीन वैद्यकीय सेवा कक्षातील सुविधा * एक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी अशी टीम 24 तास उपलब्ध * रेल्वे प्रवाशांना प्राथमिक उपचार मोफत; तर अन्य नागरिकांसाठी शंभर रूपये फी * आपत्कालीन स्थितीत घटनेपासून रूग्णालयात तात्काळ रूग्णवाहिका सुविधा * आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेत जावूनही तपासणी करणार * ईसीजी, डिफिब्रिलेटर, नेब्युलायझर आदी सुविधा उपलब्ध * स्वतंत्र औषधालयाची व्यवस्था