नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून हैदराबादला येणारं इंडिगो विमान आज सकाळी पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे. संबंधित विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे विमान कराचीला उतरवले असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असल्याचेही म्हटले आहे. इंडिगो कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात,“शारजाहहून हैदराबादला येणारी इंडिगो फ्लाइट 6E-1406 पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आली आहे. संबंधित विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर आवश्यक प्रक्रियांचे पालन करत, खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान कराचीला वळवण्यात आले आहे,” असे म्हटले आहे. कराची विमानतळावर या विमानाची तपासणी केली जात असून सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी पर्यायी विमान कराचीला पाठवण्यात आल्याची माहितीही इंडिगोकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमान कराचीत उतरवले आहे. यापूर्वी, ५ जुलै रोजी दिल्लीहून दुबईला जाणारे स्पाईसजेटचे विमान कराचीला वळवण्यात आले होते. दिल्लीहून दुबईकडे जाणारं बोईंग ७३७ मॅक्स विमान हवेत असताना, त्याच्या डाव्या टाकीतील इंधनाच्या प्रमाणात असामान्य घट दाखवण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर हे विमान कराचीला वळवण्यात आल्याचे वृत्त आहे.