ट्विटर करार पूर्ण झाल्यानंतर एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; सीईओ पराग अग्रवाल यांच्या सह वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटर करार पूर्ण केला आहे. दरम्यान, कंपनीची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभ राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्वीटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. ‘‘भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील.
तसेच सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ट्वीट मस्क यांनी केले होते. तसेच त्यांनी ट्विटर मुख्यालयाला भेट देत ट्वीटरच्या बायोमध्ये ‘ट्वीट चीफ’ असेल लिहिले होते.
एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्यवहारातून काढता पाय घेतल्यानंतर हे प्रकरण डेल्वेअर चान्सरी न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर न्यायालयाने मस्क यांना शुक्रवापर्यंत करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसर २८ तारखेला हा व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.





