अमेरिकेतील आघाडीचे आणि धनाढ्य उद्योगपती इलॉन मस्क यांनी दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेतील राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत देऊन नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. ‘अमेरिका पार्टी’ नावाचा हा पक्ष अमेरिकेतील नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये मस्क यांच्या या महत्त्वाकांक्षी धोरणाला विरोध करताना नवीन राजकीय पक्ष स्थापन करणे म्हणजे वेडेपणा असल्याचे स्पष्ट शब्दांत बजावले आहे. ज्या ट्रम्प यांच्या विजयासाठी काहीच महिन्यापूर्वी मस्क यांनी जीवाचे रान केले होते आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक निवडणूक सभांमध्ये पाठिंबा देऊन अमेरिकेचे भवितव्य ट्रम्प यांच्यामुळे सुरक्षित होऊ शकेल, असा विश्वास दिला होता, त्याच ट्रम्प यांच्याबाबत आता मस्क यांना विश्वास वाटत नसल्यानेच त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली असावी. गेल्या काही महिन्यांपासूनच ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला होता. ट्रम्प यांनी अध्यक्षीय शपथविधी झाल्यानंतर आपल्या टीममध्ये मस्क यांचा समावेश केला होता. ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ हे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे दिले होते. या खात्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या उद्योग क्षेत्राला शिस्त लावली जावी, अशी ट्रम्प यांची अपेक्षा होती. पण काहीच कालावधीमध्येच अशाप्रकारे सरकारी यंत्रणेमध्ये काम करणे शक्य नसल्याची जाणीव मस्क यांना झाल्याने ते सरकारमधून बाहेर पडले होते. अर्थात, मस्क यांच्या डोक्यातील योजना एका उद्योजकाच्या डोक्यातील योजना होत्या आणि ट्रम्प स्वतःसुद्धा एक उद्योगपती असले, तरी सध्या ते राजकारणी असल्यामुळे मस्क आणि ट्रम्प यांचे विचार जुळले नाहीत. त्याचा परिणाम म्हणूनच मस्क ट्रम्प यांच्यापासून बाजूला झाले आणि आता त्यांच्यातील वादविवाद टोकाला गेल्यामुळेच ट्रम्प यांना राजकीय आव्हान देण्यासाठीच मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षी अमेरिकेमध्ये जेव्हा मध्यावधी निवडणुका होतील तेव्हा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला चांगले यश मिळेल अशी आशा आणि खात्री मस्क यांनी व्यक्त केली आहे. पण ट्रम्प यांनी ज्या शब्दांमध्ये मस्क यांच्या या खात्रीची खिल्ली उडवली आहे ते पाहता आगामी कालावधीमध्येसुद्धा अमेरिकेतील बलाढ्य राजकारणी आणि अमेरिकेतील बलाढ्य उद्योगपती यांच्यातील हा संघर्ष चर्चेचा विषय ठरण्याचे संकेत मिळत आहेत. काही शतकांचा इतिहास असलेल्या अमेरिकन लोकशाहीमध्ये पूर्वापार फक्त दोनच पक्षांचे राज्य असते असेच आजवर सिद्ध झाले आहे. मस्क यांच्यावर टीका करत असतानाच अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये तिसर्या पक्षाला स्थान नाही, असेच ट्रम्प यांनी त्यांना बजावले आहे. तिसरा पक्ष आला तर मतदारांचा विनाकारण गोंधळ होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत जर खरोखरच लोकशाही असेल तर एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना केल्यावर त्याच्यावर अशाप्रकारे टीका करणे चुकीचे मानावे लागेल. ट्रम्प स्वतः राजकारणात येण्यापूर्वी यशस्वी उद्योजकच होते. त्यांनी फक्त स्वतःचा कोणताही पक्ष स्थापन न करता राजकारणात उडी घेऊन अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. आता त्यांनी जे एक नवीन बिल मांडले आहे ते मस्क यांना पसंत न पडल्यानेच त्यांनी त्याला विरोध म्हणून या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यावर मस्क यांची गाडी आता रुळावरून घसरली आहे आणि दिशाहीन मार्गावर चालली आहे, अशा प्रकारची टीका करून ट्रम्प यांनी एकीकडे आपण मस्क यांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षेला महत्त्व देत नाही असे जरी सांगितले असले, तरी मस्क यांच्या राजकीय हालचालींवर त्यांचे निश्चितच लक्ष असणार आहे. मस्क यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केवळ आवेशातून केली आहे का हेसुद्धा पाहावे लागेल. कारण त्यांनी ही घोषणा केल्यानंतर काहीच तासांमध्ये त्यांच्या टेस्ला या आघाडीच्या कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. मस्क स्वतः प्रथम उद्योगपती असल्याने राजकारण करत असताना आपल्या उद्योगाला धक्का पोहोचणार नाही याची काळजीसुद्धा त्यांना घ्यावी लागणार आहे. कोणत्याही लोकशाही देशामध्ये एखादा नवीन पक्षाची स्थापना करून तो यशस्वीपणे चालवणे अवघड असते हे भारतासारख्या देशामधील नव्या राजकीय पक्षांच्या स्थितीवरून आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. अर्थात, अमेरिकेच्या लोकशाहीला दोनच राजकीय पक्षांची सवय असली, तरी तिसर्या पक्षाने या लोकशाहीमध्ये येऊ नये, असा कोणताही नियम नाही. मस्क यांना ज्या प्रकारे आपला एखादा औद्योगिक प्रकल्प संपूर्णपणे नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वी करण्याची सवय लागली आहे, त्याच प्रकारे ते या राजकीय पक्षाचेही नियोजन करतील का, हे पाहणेसुद्धा उत्सुकतेचे ठरणार आहे. एकूणच जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आता राजकारणी झालेला एक पूर्वाश्रमीचा उद्योगपती ट्रम्प आणि आता राजकारणी होऊ पाहणारा विद्यमान उद्योगपती मस्क यांच्यातील संघर्ष चर्चेत राहणार आहे.