शक्तीपीठ महामार्गविरोधात एल्गार; १२ जिल्ह्यांतील शेतकरी थेट विधानभवनावर धडकणार

कोल्हापूर : शेतक-यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतक-यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. या मोर्चाला आझाद मैदानात बुधवारी सकाळी ९ वाजता सुरुवात होईल.
राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. १२ जिल्ह्यातील शेतक-यांनी शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन देणार नसल्याची शपथ घेत कोल्हापुरातून एल्गार पुकारला आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतक-यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शिवला होता. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वात लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आमदारांचे समर्थन आहे म्हणणा-या कोणत्या आमदारांचे समर्थन आहे हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठाबाबत शेतक-यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकाही शेतक-याशी चर्चा केली नसल्याचा दावा समितीने केला आहे.
महामार्ग नको, पाणी हवे…
शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा शक्तीपीठ महामार्ग जोडला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या भागातील शेतक-यांना महामार्ग नको तर पाणी हवे आहे. सरकार मात्र, उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी या महामार्गाचा घाट घालत असल्याचा आरोप होत आहे.





