Shirur News : मंचर-शिक्रापूर रस्त्याचे काम रखडले; पावसामुळे नागरिकांचे हाल, ग्रामस्थांकडून संताप
शिरूर (Shirur News) आणि आंबेगाव तालुक्यांना जोडणारा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मंचर - गायमुख ते शिक्रापूर मार्गाच्या काँक्रेटीकरणाचे काम सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Shirur News : शिरूर (Shirur News) आणि आंबेगाव तालुक्यांना जोडणारा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मंचर – गायमुख ते शिक्रापूर मार्गाच्या काँक्रेटीकरणाचे काम सध्या सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी सुमारे ४१६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली खरी, मात्र संबंधित ठेकेदार आणि रस्ते प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ऐन पावसाळ्यात प्रवाशांना (Shirur News) जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेले हे काम निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुलांचे अर्धवट खोदकाम; अपघातांना आमंत्रण
काठापूर खुर्द ते टाकळी हाजी दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावरील पुलांचे खोदकाम करून ठेवण्यात आले आहे, परंतु ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ऐन पावसाळ्यात यामुळे प्रवासी, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना रोज छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः जांबुत (ता. शिरूर) येथील जय मल्हार हायस्कूलजवळ पुलाचे खोदकाम करून ठेवल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील तात्पुरता पूल वाहून गेला असून तेथे मोठा खड्डा पडला आहे. रस्ते प्रशासन किंवा ठेकेदाराने येथे कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नाही.
“वारंवार मागणी करूनही संबंधित यंत्रणेला या गंभीर परिस्थितीचे सोयरसुतक राहिलेले नाही. येथे मोठा खड्डा पडल्याने अपघाताची दाट शक्यता आहे. जर एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला रस्ते प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असतील का?”
आनंद जगताप (अध्यक्ष, जांबुत विकास सोसायटी)
यावेळी माजी पोलीस पाटील जयसिंग जगताप पाटील, युवराज पळसकर, ग्रामपंचायत सदस्य गोरख गाजरे, सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाचे काम आणि घरांमध्ये शिरले पाणी
रस्त्याच्या कामात केवळ दिरंगाईच नाही, तर मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे, मात्र त्यासाठी मुरमाऐवजी चक्क मोठे दगड आणि मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप वडनेर खुर्दचे माजी उपसरपंच विक्रम निचित यांनी केला आहे.
तसेच, साईड पट्ट्यांसाठी वापरलेली माती रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यांमध्ये साचल्याने, गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे कडेला राहणाऱ्या अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरले. यामुळे रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी आहे.
ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी; फोन घेण्यास नकार
या गंभीर समस्यांबाबत काठापूर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते रामा दाते यांनी सांगितले की, “रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ठेकेदार, सब-ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. संबंधित ठेकेदार आणि अधिकारी फोन करूनही फोन उचलत नसल्याने त्यांच्या मुजोरीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.”
आंदोलनाचा इशारा
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या ठेकेदारावर आणि सुस्त रस्ते प्रशासनावर तातडीने कारवाई (Shirur News) करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जर परिस्थिती सुधारली नाही आणि नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळाला नाही, तर रस्त्याचे काम बंद पाडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार करण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






