Bhor News : अघोषित भारनियमनाविरोधात महावितरणवर एल्गार
Bhor News : येत्या दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा कडक इशारा नागरिकांनी दिला आहे. यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत लेखी हमी दिली आहे.

भोर : भोर तालुक्यात ग्रामीण भागासह शहरामध्ये सतत वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. संतप्त नागरिकांनी भोर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. हे आंदोलन भोर तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने झाले असून यामध्ये भोरमधील व्यापारी, फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, नगरपालिकेचे नगरसेवक व इतर नागरिकांनी सहभाग घेतला.
यापूर्वीसुद्धा भोर शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. परंतु महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करित आहेत.
सतत वीज खंडित होत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच घरगुती ग्राहकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान अंधाराचा सामना करावा लागत आहे. आंदोलनाच्या दरम्यान संतप्त नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर तीव्र शब्दात आपला राग व्यक्त केला. येत्या दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा कडक इशारा नागरिकांनी दिला आहे. यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत होण्याबाबत लेखी हमी दिली आहे.
याप्रसंगी भोर पंचायत समितीच्या सभापती मनीषा कंक, पंचायत समितीचे सदस्य राजेश बोडके, नगरपालिकेचे नगरसेवक, व्यापारी वर्ग, पत्रकार व इतर संघटनेचे सदस्य तसेच भोर शहरातील नागरिक उपस्थित होते. येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांकडून संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला.
धरण उशाला कोरड घशाला
सद्यस्थितीत भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दररोज सकाळी पाणीपुरवठ्याच्या वेळी वीज खंडित होत असल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने भोर शहरामधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्यावसायिक व घरगुती ग्राहकांचे नुकसान
वारंवार वीज खंडीत होत असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. फोटोग्राफर, लॉन्ड्री व्यावसायिक, आईस्क्रीम विक्रेते, झेरॉक्स, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असलेले व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, संगणक प्रशिक्षण संस्था, शासकीय कर्मचारी हैराण झाले आहेत. वीज खंडित झाल्याने केक शॉपमधील पदार्थाचे नुकसान होत आहे. तर, घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त होत असून पीठ गिरणी व्यावसायिक, हॉटेल चालक व इतर व्यवसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.





