अमेरिकेतल्या मसुरी प्रांतात आलेल्या वादळात 7 जणांचा मृत्यू

सेंट ल्युईस : अमेरिकेतल्या मसुरी प्रांतात आलेल्या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून कीमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे इमारतींचा काही भाग कोसळल्याने काही जण गाडले गेल्याची भीती आहे. त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. शुक्रवारी अमेरिकेत अचानक वातावरणात मोठा बदल झाला. त्यामुळे मसुरी बरोबर विस्कोन्सिन, ग्रेट लेक आणि टेक्सास प्रांतात वादळ निर्माण झाली होती. अनेक भागांमदील वीज पुरवठा खंडीत झाला होता. कमालीच्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळामुळे अनेक घरांची छप्परे उडून गेली होती. खिडक्यांची तावदाने फुटली आणि अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे मोठ्या भागातला वीजपुरवठा खंडीत झाला. सेंट ल्युईस शहरामध्ये किमान ५ जण ठार झाले असल्याचे महापौर कारा स्पेन्सर यांनी सांगितले. या वादळाचा फटका सुमारे ५ हजार घरांना बसला असून तब्बल १ लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या वादळामुळे सेंट ल्युईस शहरात आणीबाणी लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
या वादळाचा फटका १९९४ साली वर्ल्ड फेअर आणि ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या ठिकाणांबरोबर फॉरेस्ट पार्क आणि प्राणिसंग्रहालयालाही बसला आहे. एका घराचा काही भाग कोसळल्यामुळे २० जण अडकले आहेत. त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिकागो प्रांतात धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. केंटकी, दक्षिण इंडियाना, दक्षिण इलिनॉय, टेनेसीचे काही भाग, मिसूरी, अर्कांसस आणि ओहायो येथील रहिवाशांनी बेसबॉल आकाराच्या गारा पडण्यासाह तीव्र वादळांसाठी सज्ज राहावे, असे राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे.





