Sri Lanka Election : श्रीलंकेतील निवडणुका २ वर्षे पुढे ढकलाव्यात

कोलोंबो- श्रीलंकेतील अध्यक्षीय आणि संसदीय निवडणुका २ वर्षे पुढे ढकलण्यात याव्यात. यासाठी देशभरात सार्वमत घेण्यात यावे, असा प्रस्ताव अध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीने मांडला आहे.
देशात आर्थिक स्थिरता आणण्याच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अध्यक्ष आणि संसद या दोन्हीचा कार्यकाळ २ वर्षांनी वाढवण्यासाठी सार्वमत घेण्यात यावे, असेही पक्षाने सुचवले आहे.
पक्षाचे सरचिटणीस प्रलिथा रेंगे बंदारा यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. जर आवश्यकता असल्यास हा प्रस्ताव संसदेसमोर मांडण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. अलिकडेच काही वर्षांपुर्वी श्रीलंकेत आर्थिक दिवाळखोरीची स्थिती उद्भवली होती.
मात्र कठोर आर्थिक नियोजनामुळे ही स्थिती अधिक बिघडण्यापासून टाळली जाऊ शकली. या आर्थिक नियोजनाला चांगले यश येत असल्याचे बंदारा यांनी म्हटले आहे.
देशाने आंतरराष्ट्रीय विश्वास पुन्हा संपादन केला आहे. अर्थकारण पुन्हा स्थिर होते आहे. प्रशासकीय सुधारणांमुळे सरकारी कामकाज सुरळीत होते आहे. शैक्षणिक व्यवस्थाही पुन्हा सुरळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वामुळेच ही परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे आता लगेचच अध्यक्षीय आणि संसदेच्या निवडणुका घेऊन ही परिस्थिती अस्थिर केली जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
किमान २ वर्षे निवडणुका न घेण्याच्या आपल्या प्रस्तावाला संसदेतील सर्व सदस्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन देखील बंदारा यांनी केले आहे.अध्यक्षीय निवडणुका या वर्षी १७ सप्टंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येतील, असे निवडणूक आयोगाने पूर्वी म्हटले होते.





