शिक्रापूर: पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे आता मतदान आणि निकालानंतर शांत झाले आहेत. निवडणुकीच्या काळात गावोगावी वेगवेगळ्या गटांतून प्रचार सुरू असताना अनेक ठिकाणी राजकारणामुळे भावकी, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच संपले इलेक्शन आता जपा रिलेशन अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, परंतु अलीकडच्या काळात निवडणुकीचे स्वरूप बदलल्याने मैत्री आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. विविध पक्षांचे नेते निवडणुकांपुरते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात आणि निवडणूक संपल्यावर सर्व विसरून एकत्र येतात. मात्र, त्यांचे कार्यकर्ते आणि गावातील युवक अनेकदा पुढील निवडणुकांपर्यंत एकमेकांच्या विरोधात राहतात. या संघर्षात अनेकदा भावकीतील युवकांना नात्यांचाही विसर पडतो. हीच बाब लक्षात घेऊन आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणापेक्षा आपली नाती महत्त्वाची मतदान संपल्यानंतर राजकारणाचा मुद्दा सोडून देऊन आपला परिसर, मित्र आणि आपली भावकी यांचा विचार करा, तेच कायमस्वरूपी आपल्या सोबत राहणार आहेत, अशा आशयाचे आवाहन या पोस्टमधून केले जात आहे. राजकारणापेक्षा आपली नाती महत्त्वाची असून थोड्या दिवसांची निवडणूक विसरून पिढ्यानपिढ्याचा शेजारधर्म आणि नाती जपूया, असा सकारात्मक संदेश युवा पिढीकडून दिला जात आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, निवडणुकीनंतरचा तणाव कमी होण्यास यामुळे मदत होत आहे.