West Bengal elections – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि भाजपवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. कोलकाता येथील रेड रोडवर आयोजित ईदच्या विशेष प्रार्थनेनंतर जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख सर्वात मोठे घुसखोर असा केला. एसआयआरच्या माध्यमातून सामान्यांचे मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करत, आगामी विधानसभा निवडणूक ही लोकशाही अधिकार आणि बंगालची अखंडता वाचवण्यासाठीचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनर्रचनेवरून तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अल्पसंख्याक बहुल भागातील खऱ्या मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा दावा करत ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिल्याचे सांगितले. पंतप्रधान परदेशात मैत्रीच्या गप्पा मारतात, पण देशात येताच हिंदू-मुस्लिम वादाला खतपाणी घालून लोकांना घुसखोर ठरवतात; वास्तविक हे सरकारच सर्वात मोठे घुसखोर आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. तसेच, केंद्राने बंगालमध्ये अघोषित राष्ट्रपती राजवट लागू केली असली तरी आपण झुकणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या सभेत तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही मान कापली गेली तरी चालेल, पण झुकणार नाही अशा शब्दांत भाजपला आव्हान दिले. दरम्यान, भाजपने या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले असून विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींच्या विधानाचा निषेध केला आहे. देशाच्या पंतप्रधानांचा असा अपमान करणे हे घटनात्मक पदाची प्रतिष्ठा पायदळी तुडवण्यासारखे आहे. ममता बॅनर्जी यांची मानसिक स्थिती बिघडली असून त्यांना उपचारांची गरज असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेली प्रक्रिया ही केवळ पारदर्शकतेसाठी असून त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसल्याचे भाजपने म्हणटले.