पुणे बार असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुणे – जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सन 2023-24 ची वार्षिक निवडणूक 31 जानेवारी रोजी होणार आहे. शिवाजीनगर न्यायालय आवारात सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. त्याचदिवशी मतमोजणी करून रात्री निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्जाच्या फॉर्मची विक्री आणि स्वीकृती 10 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवाजीनगर न्यायालयातील पुणे बार असोसिशनच्या कार्यालयात होणार आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म माघारी घेता येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
25 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता अशोका हॉल येथे उमेदवार आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. मतमोजणी आणि निकाल 31 जानेवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. अमित गिरमे काम पाहत आहेत. उपनिवडणूक अधिकारी म्हणून ऍड दिलीप जगताप, ऍड. माधवी बाळ पोतदार, ऍड. कांताराम नप्ते, ऍड. शरद कुलकर्णी आणि ऍड. सिध्देश्वर चौधरी काम पाहणार आहेत.
अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला 10 हजार रुपये, उपाध्यक्ष पदासाठी 8 हजार रुपये, सचिव पदाकरीता 5 हजार रुपये, खजिनदार पदाकरीता 4 हजार रुपये, हिशेब तपासणीस पदाकरीता 3 हजार रुपये आणि कार्यकारिणी सभासद पदाकरीता 2 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांनी दिली.




