दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची उद्या निवड होण्याची शक्यता?

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री कोण बनणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. तो सस्पेन्स उद्या (सोमवार) संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईल, असे वृत्त एका वाहिनीने रविवारी भाजप सुत्रांच्या हवाल्याने दिले. दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली.
त्या पक्षाने दोन-तृतीयांश बहुमत मिळवत तब्बल २६ वर्षांच्या खंडानंतर दिल्ली जिंकली. मात्र, मुख्यमंत्री निवड, मंत्रिमंडळ रचना या प्रक्रिया पूर्ण करण्याची कुठलीही घाई भाजपने केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स, अमेरिका दौऱ्यामुळे त्या प्रक्रिया काहीशा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. आता मोदी परदेश दौऱ्यावरून परतले आहेत.
त्यामुळे दिल्लीतील नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार उद्या होणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता निश्चित करतील. तोच नेता नवा मुख्यमंत्री असेल. त्या पदासाठी निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून विविध नावांची चर्चा सुरू आहे. त्या नावांमध्ये काही महिला आमदारांचाही समावेश आहे.





