चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली आहे. हरियाणात आता 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. भाजप आणि आयएनएलडीने निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. राजकीय पक्षांच्या मागण्या लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. ( haryana assembly election 2024) हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार – निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाच्या तारखेत बदल झालेला नाही. मात्र हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील मतमोजणी 8 ऑक्टोबरला एकाच वेळी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नामांकनाच्या तारखा त्याच राहतील. त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. तिसऱ्या टप्प्याचे मतदानही पूर्वीप्रमाणेच 1 ऑक्टोबरला होणार आहे. 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार – निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 5 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 12 सप्टेंबर असेल. 13 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांची अर्ज नावे मागे घेता येणार आहेत. बिश्नोई समाजाचा पारंपारिक सण लक्षात घेऊन हरियाणा विधानसभेची निवडणूक आता 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.