MLC Election : पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदार संघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान
MLC Election : भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.

MLC Election : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. (MLC Election)
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा केल्यापासून संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. (MLC Election)
या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. (MLC Election)
मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे. (MLC Election)
पुणे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष, प्रशासकीय विभाग यांनी भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले आहे. (MLC Election)





