Har Ghar Tiranga : वडगावात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जय्यत तयारी
Har Ghar Tiranga : चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धांसह ई-बाईक रॅली; स्वातंत्र्य दिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम

वडगाव मावळ – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात हर घर तिरंगा अभियान राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नगराध्यक्षा अबोली ढोरे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी याबाबत माहिती दिली. अभियानाच्या नियोजनासाठी नगराध्यक्षा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शहरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत १४ ऑगस्टपर्यंत नगरपंचायत कार्यालयात नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेल्फी विथ तिरंगा उपक्रमातून नागरिक, विद्यार्थी आणि युवकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. नागरिकांनी घर, शाळा किंवा महाविद्यालय परिसरात तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून तो संबंधित संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१२ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयापासून तिरंगा प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या प्रभात फेरीत विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी तिरंगा आणि वंदे मातरम् प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याच दिवशी नगरपंचायत कार्यालयापासून वडगाव-तळेगाव साखळी रस्ता, एमआयडीसी रस्ता आणि मुंबई-पुणे महामार्ग मार्गे वडगाव फाटा ते श्रीमंत महादजी शिंदे स्मारकापर्यंत बाईक, सायकल आणि ई-बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना आणि सहभागींचा बक्षीस वितरण समारंभही आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
अभियानाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे. तिरंगा आणि वंदे मातरम् या विषयांवर निबंध, प्रश्नमंजुषा, चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांविषयी माहिती मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नगरपंचायत कार्यालयात करण्यात येणार आहे. यावेळी ध्वजारोहणासह तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभात फेरी आणि शूरवीरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या तसेच देशसेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचे नियोजन आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नगरपंचायतीकडून करण्यात येणार आहे.




