Nashik : ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंचा धक्का; नाशिकमधल्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

नाशिकः विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुहायुतीची सत्ता आली. यामुळे आघाडीतून अनेक नेत्यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केले. आता शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अॅापरेशन टायगर राबवले जात आहेत. या माध्यमातून अनेकजण शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. यातच आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
नाशिकमधील मनसे, उबाठा गटातील माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. येत्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, यामुळे हा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. अॅापरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाला कमकुवत केले जात आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे राजन साळवी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे शिवसेना शिंदे पक्षातील इन्कमिंग वाढले आहे. सत्ता आणि राजकीय भविष्याचा विचार करुन ठाकरे गटातून पडणारे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत.
यांना केला पक्षप्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे, उद्धव ठाकरे गटातील नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
राजन साळवेंची शिंदेंना साथ
राजन साळवी मागच्या अनेक निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघातून निवडून येत आहेत. मात्र, 2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार किरण सामंत यांनी राजन साळवींचा पराभव केला. साळवी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे पक्षात जाण्याचे ठरवले आहे. साळवी यांच्या यांच्या जाण्याने कोकणात ठाकरे गट आणखी कुमकुवत होणार असल्याचे बोलले जात आहे.





