मुंबई : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये नाराजीनाट्य असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला अशी चर्चा सुरु आहे. सर्व काही सुरळीत सुरु नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनाच फुटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. काय म्हणाले संजय राऊत? संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे काम झाले असून आता त्यांचे स्वतःचे काम तमाम होणार आहे. त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे. येत्या काही दिवसांत त्यांचा पक्ष भाजपात विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल. हे मी स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो, संजय राऊत यांनी केला आहे. पुढे म्हणाले, जे लोक आमचा पक्ष सोडत आहेत ते पदाधिकारी आहेत. पुढील दोन दिवसांत आमची बैठक होणार असून आम्ही काही जणांना नव्याने जबाबदारी देणार आहोत. आम्ही खचणारे लोक नसून जाणाऱ्यांना जाऊ द्या. त्यांच्या काहीतरी अडचणी असून जुन्या केसेस काढल्या जात आहेत. काही लोकांची मने कमकुवत झाली असून लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत. अशा लोकांना पक्षात ठेवून तरी काय करायचे, असं म्हणत संजय राऊतांनी पक्ष सोडणाऱ्या लोकांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे शुद्ध वेडेपणा : चंद्रशेखर बावनकुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणले, यासाठी त्यांनी संतोष देशमुख यांच्या खुनाचा वापर केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याला प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. संतोष देशमुखाच्या मारेकरीला फाशी व्हावी म्हणून चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांनी भडकवण्याचे काम करू नये. देशमुख हत्या ही गंभीर बाब आहे. याकडे राजकारण म्हणून बघू नये, आरोपीला फाशी झाली पाहिजे. यासाठी सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे.