एकनाथ शिंदेंची अर्थखात्याबाबत थेट अमित शाहांकडे तक्रार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले…

Ajit Pawar On Eknath Shinde | केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावेळी महायुतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत अजित पवार यांच्या अर्थखात्याविषयी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महाराष्ट्राच्या अर्थखात्याबाबत निधीवाटपावरुन तक्रार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची बाब शिंदे यांनी शहांना सांगत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
“मला अमित शहा याबाबत असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडं तक्रार करतील, असं वाटत नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील. तेवढे आमचे संबंध चांगले आहेत. डीपीसीसाठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे, तो सुद्धा आम्ही दिला आहे. त्यावर मार्ग निघेल. मार्ग निघाल्या निघाल्या तुम्हाला सांगू,” असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजून निर्णय झाला नाही. आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरु आहे, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली. Ajit Pawar On Eknath Shinde |
दरम्यान, शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईली अर्थखात्याकडून लवकर मंजूर होत नाहीत. अर्थखात्याकडून शिवसेनेच्या फाईल्स वेळेवर मंजूर झाल्या पाहिजे, यासाठी शिंदे यांनी शाहांकडे आग्रह धरल्याची चर्चा सुरू आहे. सोबतच या बैठकीत रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा, अशीही मागणी शिंदे यांनी शाह यांच्याकडे केल्याचेही म्हंटले जात आहे.
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची 11 एप्रिल रोजी पुण्यात भेट झाली. याच भेटीत यासंदर्भात चर्चा झाल्याचं म्हटले जात आहे. परंतु आता यावर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही वाचा:





