शिवकुमार बनणार एकनाथ शिंदे? भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण

बंगळुरू : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार राज्याचे एकनाथ शिंदे बनू शकतात, असा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला. त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षही असणारे शिवकुमार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांनीच तशा शक्यतेचा स्पष्ट इन्कार केला. तसे असले तरी शिवकुमार यांच्यावरून सध्या कर्नाटकचे राजकारण ढवळून निघाल्याचे दिसत आहे.
कॉंग्रेसशासित कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात सुप्त सत्तासंघर्ष सुरू असल्याचे बोलले जाते. अशात सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनने महाशिवरात्रीनिमित्त तामीळनाडूत विशेष सोहळ्याचे आयोजन केले. त्या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवकुमार उपस्थित राहिले. त्या घडामोडीमुळे कर्नाटक कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या विचारसरणीशी शिवकुमार जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे कॉंग्रेसच्या एका गटाला वाटत आहे.
अशात भाजपच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय सनसनाटीत वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ यावर्षी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने त्यावेळी महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. शिंदे यांच्यासारखी कृती शिवकुमार करू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रासारखी घडामोड कर्नाटकात घडू शकते, अशा आशयाचा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला.
अर्थात, भाजपचेच प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी त्यांच्या पक्षात शिवकुमार यांचा प्रवेश होण्याची शक्यता फेटाळून लावली. मात्र, कर्नाटक कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठीची स्पर्धा गतिमान बनली आहे. त्यातून काही वेगवान राजकीय घडामोडी घडतील, असे भाकीत त्यांनी केले. शिवकुमार यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची शक्यता कॉंग्रेसमधील त्यांच्या समर्थकांनीही धुडकावली. शिवकुमार हे पक्के कॉंग्रेसजन आहेत. त्यांच्या रक्तात कॉंग्रेस आहे, असे त्या समर्थकांनी म्हटले.





