Eknath Shinde : सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला अचानक बगल देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट देशाची राजधानी दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Eknath Shinde : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला अचानक बगल देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट देशाची राजधानी दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
२ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव आणि मूळ ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर निर्णायक सुनावणी सुरू होत असतानाच शिंदेंच्या (Eknath Shinde) या अनपेक्षित दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटावर जोरदार राजकीय प्रहार केला.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर रणनीतीचा आढावा घेण्यासाठी तसेच पक्षाच्या इतर बैठकांसाठी दिल्लीत आल्याचे स्पष्ट करत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होते आणि ते हे चिन्ह देव्हाऱ्यात पुजायचे, याची आठवण त्यांनी करून दिली.
२०१९ मध्येच ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि जनतेने दिलेला कौल गोठवला होता, असा घणाघात करत शिंदेंनी पक्षाची मूळ घटना बदलण्याचे कामही त्यांनीच केल्याचा आरोप केला. आता बाळासाहेबांचे अस्तित्व, विचार आणि राष्ट्रीयत्वाची भूमिका पुसण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी आपण बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा निष्ठेने पुढे नेत असून जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
न्यायालयीन प्रकरणावर थेट बोलणे टाळत लोकशाहीत बहुमतालाच सर्वोच्च स्थान असते, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. काही मंडळी न्यायालयालाही मार्गदर्शन करतात आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर वाटेल तसे बिनबुडाचे आरोप करतात, असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट करत त्यांनी (Eknath Shinde) आगामी सुनावणीपूर्वी आपला आत्मविश्वास दाखवून दिला.






