मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांना जोरदार झटका दिला आहे. तानाजी सावंत परभणीचे पालकमंत्री आहेत. तसेच ते मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीयही मानले जातात. पण त्यांच्यावरच शिंदे गटाच्या नेत्यांना डावलून भाजप व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निधी दिल्याचा आरोप होत आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.
पालकमंत्री असणाऱ्या डॉ.तानाजी सावंत यांनी मागील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या 150 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. त्यात भाजप, कॉंग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना हा निधी वाटप करण्यात आला. तसेच ज्या कामांना मंजुरी देण्यात आली त्याच्या याद्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या.
पण शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख व अन्य नेत्यांनी या प्रकरणी सत्ताधारी शिवसेनेवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सावंत यांच्यावर निधी वाटपात आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच या 150 कोटींच्या निधी वाटपाला स्थगिती देण्याचीही मागणी केली. त्यानंतर शिंदे यांनी सावंत यांनी जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीद्वारे मंजूर केलेल्या विकास कामांना तातडीने स्थगिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनात गावडे यांच्याशी चर्चा केली. तसेच ही कामे काही दिवसांसाठी थांबवण्याचेही निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी जोरदार झटका असल्याचे मानले जात आहे.