Eknath Khadse : ‘हा’ व्यक्ती मला सीडी देणार होता, पण..; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सीडीबाबत मोठा गौप्यस्फोट करत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे यांनी अनेकदा म्हटलं होतं की, तुम्ही ईडी लावाली तर मी सीडी लावणार, आपल्या या वक्तव्यावर बोलताना त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. प्रफुल लोढा हाच मला सीडी देणार होता, म्हणून तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावणार म्हणालो होतो, मात्र त्यांनी मला सीडी दिली नाही, म्हणून मी बदनाम झालो असे एकनाथ खडसे म्हणाले.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले गिरीश महाजन यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं, प्रफुल लोढाची नार्कोटेस्ट करावी, महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी खडसे यांनी केली आहे. एका वाघा पुढे यांना लांडग्याची फौज उभी करावी लागते पण वाघ तो वाघ असतो. गिरीश भाऊ म्हटले होते की विषय संपला मात्र प्रफुल लोढा जेलमध्ये आहे तोपर्यंत हा विषय संपणार नाही. गिरीश महाजन यांनी माझ्यावर ईडी संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले, मला अडकवण्याचं काम महाजनांकडून झालं, ईडी सारख्या प्रकरणातून बाहेर आलो. माझ्या जावयाला यांनी जेलमध्ये टाकलं, असा आरोपदेखील एकनाथ खडसेंनी यावेळी केला.
खडसेंचा सवाल
सध्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ईडी सारखे असे अनेक आरोप असताना ते कसे काय पवित्र झाले? असा सवाल यावेळी एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर वातावरण तापण्याची शक्यता आहे.





