Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या घरून चोरी झालेला ऐवज तर सापडला; पण ‘त्या’ सीडीचं काय?

Updated On:
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या घरून चोरी झालेला ऐवज तर सापडला; पण ‘त्या’ सीडीचं काय?

जळगाव  : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांना अंशतः यश आले आहे. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल स्वीकारणारे आणि विक्री करणारे दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मौल्यवान सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अद्याप पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले नाहीत.

अटक करण्यात आलेले आरोपी
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे चिराग सय्यद (उल्हासनगर) आणि कैलास खंडेलवाल (सराफ व्यवसायी) अशी आहेत. घरफोडी करणाऱ्यांनी चोरीचा मुद्देमाल प्रथम चिराग सय्यद याच्याकडे सोपवला होता, तर सय्यद याने तो कैलास खंडेलवाल याच्याकडे विक्रीसाठी दिला होता. दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे मुख्य तीन आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा हे अद्याप फरार आहेत. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, हे तिघे सराईत गुन्हेगार असून त्यांचा शोध सुरू आहे.

कागदपत्रे, सीडी, पेन ड्राईव्हचा दावा खोटा?
घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत घरातून कागदपत्रे, सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेल्याचा दावा केला होता. मात्र, पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी स्पष्ट केले की, खडसे यांच्या एफआयआरमध्ये किंवा पुरवणी जबाबात अशा कोणत्याही वस्तू चोरीला गेल्याचा उल्लेख नाही. अटक आरोपींकडूनही असे कोणतेही कागदपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोरेज डिव्हाइस सापडलेले नाहीत.

चोरीला गेलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे
खडसे यांच्या घरातून चोरीला गेल्याचा अंदाजे १० ते १२ लाख रुपये किंमत असलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे होता
सोने (एकूण ६८ ग्रॅम):
२० ग्रॅमची गहू पोत, ७ ग्रॅमचे कानातले, ४ ग्रॅमचे डायमंडचे कानातले, ७ ग्रॅमच्या अंगठ्या, १० ग्रॅमचे गोल, २० ग्रॅमच्या चार अंगठ्या.

चांदी (एकूण ७ किलो ७०० ग्रॅम)
१ किलोची गदा, १ किलोचे त्रिशूल, सहा चांदीचे ग्लास, २ किलोची चांदीची तलवार, २ किलो वजनाचे दोन चांदीचे रथ

रोख रक्कम
३५,००० रुपये

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाचे नेमके मूल्य आणि प्रमाण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही, मात्र चोरीच्या दागिन्यांचा मोठा भाग हस्तगत झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपास सुरू
या घरफोडी प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी सांगितले की, आरोपी सराईत असल्याने त्यांना लवकरच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेमुळे जळगावातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खडसे यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक

2026-10-07 19:17:43

Shiranthi Rajapaksa : श्रीलंकेच्या माजी फर्स्ट लेडी शिरांथी राजपक्षे यांना अटक

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका

2026-10-04 16:39:28

Jairam Ramesh : सत्तेचा अहंकार आत्मघातकी असतो; जयराम रमेश यांची टीका

Lovely University Violence : पोलिसांची मोठी कारवाई ! लवली युनिव्हर्सिटी हिंसाचार प्रकरणी 7 विद्यार्थ्यांना अटक

2026-10-02 21:08:30

Lovely University Violence : पोलिसांची मोठी कारवाई ! लवली युनिव्हर्सिटी हिंसाचार प्रकरणी 7 विद्यार्थ्यांना अटक

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक

2026-10-02 17:32:46

Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! आंदोलनापूर्वी मनसेच्या 'या' बड्या नेत्याला अटक