KBC 18 : खिशात 24 रुपये घेऊन मुंबईत आला; जळगावचा भूषण KBC 18 चा पहिला करोडपती, आता 7 कोटींचा प्रश्न!
KBC 18 : KBC 18 मध्ये जळगावच्या २८ वर्षीय भूषण ठाकरेने एक कोटी रुपये जिंकले. खिशात २४ रुपये घेऊन मुंबईत आलेल्या भूषणसमोर आता सात कोटींच्या प्रश्नाचे आव्हान आहे.

KBC 18 : अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या १८ व्या पर्वाला पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील जळगावचा २८ वर्षीय भूषण ठाकरे याने एक कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
आता त्याच्यासमोर सात कोटी रुपयांचा अंतिम प्रश्न असणार आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी खिशात अवघे २४ रुपये घेऊन तो मुंबईत आला होता. आपल्या आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या भूषणच्या यशाची सध्या चर्चा होत आहे.
आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवली –
सोनी टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमध्ये भूषणने एक कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याचे दिसत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्याला मिठी मारून अभिनंदन केले.
कार्यक्रमात भूषणने आपल्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी सांगितली. त्याचे वडील रोजंदारीवर काम करत होते, तर आईची प्रकृती वारंवार बिघडत होती. तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही झाल्या. आर्थिक अडचणी असतानाही वडिलांनी त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ दिला नाही.
दीड वर्षांपासून घरी गेला नाही
भूषणने सांगितले की, तो गेल्या दीड वर्षांपासून घरी गेलेला नाही. आयुष्यात काहीतरी मोठे यश मिळवल्यानंतरच घरी परतण्याचा त्याने निर्णय घेतला होता. आई-वडिलांनी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांना अभिमान वाटेल असे काहीतरी करून दाखवण्याची त्याची इच्छा होती.
वडिलांनी मजुरी करण्यापासून रोखले
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना भूषणला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तो घरी राहून अभ्यास करत होता. वडिलांना रोजंदारीवर काम करताना पाहून आपणही काहीतरी काम करून पैसे कमवावेत, असे त्याला वाटले. त्याने गावातील नदीवर काम करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिलांनी त्याला मजुरी करण्यास मनाई केली. मुलाने काम करण्याऐवजी शिक्षण पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती.
आता सात कोटींच्या प्रश्नाचे आव्हान
भूषणने एक कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून आता त्याच्यासमोर सात कोटी रुपये जिंकण्याची संधी आहे. मात्र, त्याने सात कोटींच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे की नाही, याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्याला अंतिम बक्षीस मिळणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
‘कौन बनेगा करोडपती १८’ हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रसारित होतो.





