Eknath Khadse | पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात युवतीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच आता केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि त्यांची मुलगी जळगावामधील मुक्ताताईनगरमध्ये यात्रेसाठी आल्या होत्या. या यात्रेमध्ये काही टवाळखोर मुलांकडून मुलीची छेड काढण्यात आली. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नसेल तर सर्वसामन्यांचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुलींची सुरक्षितता ही फार अवघड बाब असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, अशी घटना घडणे दुर्देवी आहे. मुक्ताईनगरच नाही तर राज्यभरात अशा घटना घडत आहेत. ज्यावेळी माझ्या नातीने मला हे सांगितले त्यावेळी मी तिला सांगितले की, तू स्वत: जाऊन तक्रार कर. कारण अशा घटनांमध्ये मुली तक्रार करायला घाबरतात. हे टवाळखोर गुंड आहेत. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. घटनास्थळी पोलीस होता, त्याला गुंडानी मारहाण केली. पोलिसांचा धाक गुंडावर नाही का? मुलींची छेड काढणे, त्यांचे फोटो काढणे, सगळे गुंड एकत्रित आले त्यामुळे मुली घाबरल्या. पोलीस होते मात्र त्यांनाही मारहाण झाली, असे एकनाथ खडसे म्हणाले. या गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे संरक्षण असल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.