पुणे जिल्हा | अवकाळी पावसातच आठ लाख गेले पाण्यात

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – येथे गुरुवारी (दि 16)झालेल्या वळवाच्या पावसात येथील बस स्थानकात पाणीच पाणी झाले असून प्रवाशांना त्याचा मोठा त्रास होत आहे. मागील वर्षी आगारात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महामंडळाने सुमारे 8 लाख रुपये खर्च केले होते मात्र ते पाण्यात गेले आहेत. दरम्यान, बस स्थानकात साचलेले पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिक प्रवाश्यांचे मोठे हाल होतात.
पुणे-नाशिक-मुंबई या मार्गावरचे राजगुरूनगर येथील एसटी बस आगार एसटी महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार आहे. या आगारातून पुणे-नाशिक-औरंगाबाद-मुंबई आदी भागात एसटी बसेस धावतात प्रवासाचा अगदी सोयीचे असे बस स्थानक आहे. मात्र या बस स्थानकापुढे मोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांत पाणी साचल्याने स्थानकात जणू तळे साचले आहे, अशी अवस्था झाली आहे. स्थानकात अनेक खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होतो. तर खड्डे पडल्याने आणि त्यात पाणी साचल्याने एसटी बसेस खड्ड्यात आदळल्याने बस मधील प्रवाशांची हाडे ढिल्ली होत आहेत तर बसचे नुकसान होत आहे.
चिखलातून काढावा लागतो मार्ग
पुणे-नाशिक-मुंबईकडे जाणार्या बसेस पाण्यात थांबतात त्यामुळे साचलेल्या घाण पाण्यातून नागरिकांना मार्ग काढत बसेसमध्ये बसावे लागते त्यातच पाऊस पडून गेल्यानंतर मोठा चिखल होतो त्यात प्रवाशांची कपडे खराब होतात. बसेसमध्ये चिखल जात असल्याने बसेस खराब होत आहेत सर्वात जास्त नुकसान प्रवाश्यांच्या किमती बूट आणि चपलांचे होत आहे. या पाण्यातून बसेस मध्ये चढताना उतरताना त्यांचे बूट चपला पाण्यात भिजतात त्यांच्या सामानाच्या बॅग ओढत बसेस मध्ये नेता येत नाहीत .





