उत्तर कॅलिफोर्नियातील वणवा विझवण्यासाठीचे प्रयत्न अजूनही सुरू

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियाच्या उत्तरेकडील भागातल्या जंगलात लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवले जाऊ शकलेले नाही. या वणव्यामध्ये किमान १३० घरे जळून खाक झाली आहेत आणि हजारो जणांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागलेला आहे.
कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रॅमेंटोच्या उत्तरेकडील चिकोजवळ बुधवारी दुपारी लागलेली ही आग झपाट्याने ६६० चौरस किलोमीटरहून अधिक भागात पसरली आहे.
ही आग जाळपोळीच्या प्रयत्नामुळे लागल्याचा अधिकाऱ्यांना संशय असून ४२ वर्षीय व्यक्तीला जाणीवपूर्वक आग लावल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
या व्यक्तीने पेटलेली कार एका खोल नाल्यामध्ये ढकलून दिल्यामुळे हा वणवा भडकल्याचा संशय आहे. ही कार २० मीटर खोल खड्ड्यात पडली आणि आग भडकली.
तब्बल ३,५०० लोकांनी आधीच त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असल्याच्या वृत्ताला कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरने गुरुवारी पहाटे दुजोरा दिला.





