शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती
– प्रा. डॉ. सुभाष राठोड
शाळा-महाविद्यालये केवळ नावापुरतीच उरली असून, ‘क्लासेसमधूनच यश मिळते’ अशी चुकीची समजूत समाजमनात खोलवर रूजली आहे. हे भयंकर वास्तव आहे.
आज भारतीय शिक्षणक्षेत्र एका गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. शिक्षणाचे केंद्रीकरण शाळा व महाविद्यालयांच्या हातून निसटून खासगी कोचिंग क्लासेसकडे झुकत चालले आहे. खरं शिक्षण क्लासमध्येच मिळतं ही अपप्रवृत्ती पालक, विद्यार्थी आणि समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजली आहे. या कोचिंग क्लास संस्कृती’चा प्रसार इतका वेगाने होत आहे की, शैक्षणिक व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
आज शिक्षण म्हणजे केवळ ‘गुण कसे मिळवायचे?’ या प्रश्नाभोवती फिरणारी एक शर्यत बनली आहे. या शर्यतीत शाळा-महाविद्यालये मागे पडत असून पुढे निघाले ते कोचिंग क्लासेस! मुलांच्या आयुष्यातील सर्व वेळ, ऊर्जा आणि पालकांच्या खिशातील पैसा खासगी कोचिंगच्या विळख्यात अडकले आहेत. शिक्षणक्षेत्राची दिशाच बदलून टाकणारी ही ‘कोचिंग संस्कृती’ शैक्षणिक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालू लागली आहे.
सध्याच्या शिक्षणपद्धतीत एक गंभीर आणि चिंताजनक प्रवृत्ती पाहायला मिळते- विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण संस्था म्हणजेच शाळा व कॉलेजकडे पाठ फिरवून कोचिंग क्लासेसकडे धाव घेत आहेत. शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचं साधन’ बनल्यामुळे, त्या दिशेने झपाट्याने चाललेली ही धाव वास्तवात अनेक शैक्षणिक प्रश्नांची जननी ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा केंद्रबिंदू शाळा महाविद्यालये. जिथे शिक्षकांचा सुसंवाद, सहशिक्षकांच्या संवादातून होणारे समृद्धीकरण आणि अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रमांची समांतर वाटचाल इत्यादी. पण आज विद्यार्थी जीवनातून हा सांघिक शिक्षणाचा गाभा हरवत चालला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. कारण पालकांच्या मनात एक भीती बसवली गेली आहे- क्लास लावला नाही तर मूल मागे पडेल!
शिक्षक रिकाम्या वर्गाला शिकवतो आणि त्याचा थेट परिणाम अभ्यासाच्या गुणवत्तेवर होतो. वर्गात जे शिकवले जाते तेच क्लासमध्ये पुन्हा शिकवले जाते, पण फी च्या दुप्पट किमतीत. ही दुहेरी शिक्षण व्यवस्था समाजात एक गोंधळ निर्माण करते. त्यामुळे शाळा-कॉलेज केवळ ‘सर्टिफिकेट मिळवण्याचे ठिकाण’ बनून राहतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात, महानगरांतील नामांकित क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांकडून आठवी-नववीपासूनच खखढ, गएए, छएएढ, चकढ-उएढ, छऊअA यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेतली जाते. या सार्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेचे विदारक वास्तव समोर येते. एकेकाळी शिक्षक म्हणजे ज्ञानदाते, मार्गदर्शक आणि आदर्श मानले जायचे. पण आज ‘शिक्षण’ एक व्यवसाय बनले आहे, तर ‘कोचिंग’ हे बाजारपेठेतील विक्रीयोग्य उत्पादन झाले आहे.
आज मोठमोठ्या शहरांपासून गावांपर्यंत छएएढ, गएए, चकढ-उएढ, णझडउ, छऊअA अशा परीक्षांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे कोचिंग क्लासेस उभे राहिले आहेत. आज शिक्षक हे ‘कोच’ झाले आहेत आणि शिक्षण हे ‘सेवा’ न राहता थेट उद्योग बनले आहे. कोचिंग क्लासेसचं अवाजवी बाजारीकरण हे शिक्षणाच्या शुद्धतेवर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गडद सावली टाकत आहे.
एका वर्षासाठी लाखो रुपये फी भरावी लागते. अनेक कोर्सेससाठी विविध क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. दरवर्षी लावलेल्या मोठ्या जाहिराती, टॉपर मुलांचे फोटो लावून मानसिक खेळ खेळला जातो.
पालकही महागडा क्लास म्हणजे चांगले शिक्षण असा समज करून घेतात आणि मोठ्या आर्थिक ओझ्याखाली वावरतात. काही मोठ्या कोचिंग संस्थांचे टायअप इतके महागडे असतात की घरचं सोनं गहाण ठेवून फी भरावी लागते. ही रक्कम इतकी अवाजवी आहे की ती शिक्षणाच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करते. अनेक क्लासेस शुल्कपरतावा नाकारण्याचे स्पष्ट धोरण ठेवतात.
प्रवेश घेतल्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जात नाही. धोरणे नीट वाचूनच प्रवेश घ्या, हा त्यांचा ठाम आणि निर्भीड आग्रह असतो, जणू शिक्षण नव्हे तर करार केला जातो. काही शाळा-कॉलेजेस तर क्लासेससोबतच समन्वय साधून ‘इंटिग्रेटेड’ अभ्यासक्रम राबवत आहेत. कोचिंग क्लासेस आणि शाळा-कॉलेजमधील ही एक अपवित्र युती म्हणावी लागेल. यातून शाळा-कॉलेजलादेखील काही फायदा मिळत असल्याने ते मूग गिळून गप्प राहतात. हे या क्लास-शैक्षणिक संस्था युतीतून शिक्षणाचा खरा आत्मा हरवत चालला आहे. या सगळ्यातून शैक्षणिक दलालीचं भयंकर रूप तयार होत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, आज शिक्षण व्यवस्थेत एक खोल विषमता निर्माण होत आहे. एक सामाजिक विषमता वाढत आहे. गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही आणि शिक्षण फक्त श्रीमंतांसाठी आरक्षित होत आहे. कोचिंग क्लासेसचे वाढते अस्तित्व हे केवळ शैक्षणिक संकट नाही; ते सामाजिक अन्याय, मानसिक आरोग्य आणि आर्थिक शोषणाचे मूळ बनत चालले आहे. त्यामुळे, आजही वेळ आहे शिक्षण क्षेत्राने स्वतःकडे बघण्याची. शाळा-कॉलेज हे शिक्षणाचे खरे केंद्र असावे आणि क्लासेस हे केवळ पूरक माध्यम असावे, याकडे धोरणात्मक पातळीवर लक्ष द्यायला हवे. अन्यथा ‘शाळा’ नावाच्या संस्थेचा समाजातला आदर संपेल आणि शिक्षण ही केवळ विक्रीसाठी असलेली वस्तू बनेल आणि ती स्थिती कोणालाही हितावह ठरणार नाही. या क्लास संस्कृतीला लगाम घालणे गरजेचे आहे.





