सातारा- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवारी (दि. १० नोव्हेंबर) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील १३ केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असून या परीक्षेसाठी आठ हजार ४४२ उमेदवार बसणार आहेत, अशी माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली. राज्यातील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा व शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते. रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक एक सकाळी १०.३० ते एक व दुपारच्या सत्रात पेपर क्रमांक दोन हा २ .३० ते ५ दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. या परीक्षेसाठी ८ हजार ४४२ उमेदवार बसणार आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज,लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालय, महाराजा सयाजीराव विद्यालय, श्रीपतराव पाटील हायस्कूल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, छत्रपती शाहू ॲकॅडमी, सुशीलादेवी कन्या प्रशाला, अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भवानी विद्यामंदिर, न्यू इंग्लिश स्कूल सातारा या १३ परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेशपत्राशिवाय मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना,पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शाळा महाविद्यालयाचे अद्ययावत ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती शबनम मुजावर यांनी दिली. परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थींची व्यवस्थित तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रतिबंधित केलेली कोणतीही वस्तू त्यांच्यासोबत परीक्षा केंद्रामध्ये घेवू जावू नये. यासाठी प्रवेशद्वारावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. – शबनम मुजावर (प्राथमिक शिक्षणाधिकारी)