अग्रलेख : विश्वयुद्धाच्या दिशेने?

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धामध्ये अचानक काल अमेरिकेने उडी घेतली आणि या युद्धाचा भडका अधिक व्यापक होण्याची शक्यता वाढली. मुळातच इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची धग मोठी आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडून एकमेकांचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यातच आता अमेरिकेने इराणमधील अणुप्रकल्पांवर हल्ले करून आपला खूप दिवसांपासूनचा बाकी असलेला हिशेब पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे.
इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवावा आणि अमेरिकेबरोबर त्याविषयी चर्चा करावी, अशी मागणी अमेरिकेकडून वारंवार केली जात होती, पण त्याला इराणकडून धूप घातली जात नव्हती. आता इस्रायलबरोबर त्यांचा संघर्ष उडाल्यानंतर या संघर्षाची संधी हेरून अमेरिकेने आपला डाव साधला आहे.
पण हे प्रकरण तेवढ्यापुरतेच सीमित राहील असे नाही, कारण, इराणवर हल्ले केल्यास आम्ही इराणच्या पाठीशी उभे राहू, अशी स्पष्ट भूमिका रशिया आणि चीन या देशांनी घेतली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या या संघर्षाची व्याप्ती झपाट्याने अधिक व्यापक होताना दिसत असून हे युद्ध तिसर्या महायुद्धाच्या दिशेने जात आहे काय, असा प्रश्न अनेक जाणकार उपस्थित करीत आहेत.
इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर त्या दोन देशांच्या वादात आपण इतक्यात पडणार नाही, आम्हाला किमान पंधरा दिवसांचा अवधी पाहिजे अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली होती. पण अशी भूमिका घेतल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांनी इराणवर पहाटे हे हल्ले करून संपूर्ण जगाला चकित करून टाकले आहे.
अमेरिकेच्या या हल्ल्यांना इराणकडून आज इतक्यात काही तातडीचा प्रतिसाद दिला जाईल अशी अपेक्षा नाही, पण भविष्यात तो धोका कायम राहणार आहे. मुळात अमेरिकेचा हल्ला झाल्यानंतर इराणने इस्रायल विरोधातली आपली कारवाई अधिक वेगवान केली असून अतिसंहारक क्षेपणास्त्रे इराणने इस्रायलवर डागली आहेत. त्यामुळे इस्रायलचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे.
इस्रायल हा फार शक्तिशाली आहे आणि त्यांच्याकडे फार मोठी लष्करी यंत्रणा आहे असा जो बागुलबुवा गेले काही दिवस निर्माण केला गेला होता त्याला टाचणी लावण्याचे काम इराणने केले आहे. इस्रायलच्या राजधानीच्या शहरापासून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर इराणने हल्ले करून तेथे अक्षरशः विनाश माजवला आहे.
कमकुवत इराणकडे इतकी शक्ती नाही अशा भ्रमात इस्रायलचे लोक होते आणि त्यातच अमेरिकेचा आपल्याला एकतर्फी पाठिंबा आहे त्यामुळे इराण आपल्या विरोधात कारवाई करायला कचरेल असे इस्रायलचे म्हणणे होते; परंतु हे सगळे साफ खोटे ठरले आहे. इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांनी अत्यंत धाडसाने इस्रायलचा जो मुकाबला केला त्याचे लष्करी तज्ज्ञांकडून कौतुकच होताना दिसत आहे.
या हल्ल्यात इस्रायलचे जे अति प्रचंड नुकसान झाले आहे त्यातून त्या देशाला सावरायला बरेच दिवस लागतील. मुळात दोन्ही देशांमध्ये हा संघर्ष कधी आटोक्यात येईल याचा अजून कोणाला अंदाज आलेला दिसत नाही.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणने माघार घ्यायला किंवा शस्त्रसंधी करायला स्पष्ट नकार दिला असून या टप्प्यावर जर आम्ही आज शस्त्रसंधी केली तर इस्रायलला सावरायला खूप वेळ मिळेल आणि या घडीला आम्ही तो धोका पत्करू शकत नाही, अशी जाहीर भूमिका इराणने घेतली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या संघर्षावर इतक्यात तोडगा निघण्याची शक्यता नाही.
अमेरिकेसह जगातल्या अन्य शक्तिशाली देशांनी दिलेल्या धमक्यांना इराण भीक घालणार नाही त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती नेमके काय वळण घेईल याची कल्पना करवत नाही. या सगळ्या संघर्षाला वास्तविक खूप आधीच आळा घालता आला असता. पण इस्रायलचे धाडस अंगलट आले आहे. काहीही तात्कालिक महत्त्वाचे कारण नसताना इस्रायलने इराणवर हल्ला करून त्यांना डिवचण्याचे काम केले.
इस्रायलने आपल्या लष्करी ताकदीविषयी फुकाचा अभिमान बाळगला होता तो अभिमानही अंगलट आला आहे. अमेरिकेकडून आपल्याला तातडीने मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती, पण ती मदत करायलाही अमेरिकेकडून विलंब झाला आहे आणि त्यांनी इस्रायलला लष्करी सामग्रीची मदत पाठवण्याऐवजी इराणवर हल्ला करून हा विषय वाढवून ठेवला आहे.
इराणला पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी रशिया आणि चीन हे दोन शक्तिशाली देश तयार आहेत. त्यांच्याकडून मदत घेऊन इराण आपला इस्रायलबरोबरचा संघर्ष यापुढे कितीही काळ चालू ठेवू शकतो; पण एवढा दीर्घकाळ इराणकडून होणारा मारा सहन करण्याची क्षमता इस्रायलकडे आहे काय, याचा विचार केला पाहिजे, या सगळ्या संघर्षात शांतता निर्माण व्हावी किंवा तडजोड व्हावी यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही.
संयुक्त राष्ट्रांकडूनही या अनुषंगाने काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. केवळ शांततेचे तोंडी आवाहन संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस करतात; परंतु त्यांना कोणी धूप घालत नाही. खूप पूर्वी भारताकडे शांतता निर्माण करण्याची क्षमता होती त्यानुसार पंतप्रधान मोदी यांनी इराणला फोन करून शांततेचे आवाहन केले आहे; पण त्याचाही फार उपयोग होईल असे चिन्ह नाही. त्यामुळे हे सगळेच प्रकरण संपूर्ण जगाला तापदायक ठरणार आहे, हे मात्र नक्की.





