Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनामुळे भारतीय संगीतसृष्टीतील एका अष्टपैलू सुराचा अस्त झाला आहे. गेली आठ दशके हिंदी, मराठी आणि अनेक भाषातील संगीत रसिकांना आपल्या अष्टपैलू आवाजाने आणि वैविध्यपूर्ण गायकीने रिझवणार्या या ज्येष्ठ गायिकेच्या निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीच्या संगीत क्षेत्रामध्ये खरोखरच एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खरे तर मोठ्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये छोटी झाडे कधीही उगवत नाहीत किंवा वाढत नाहीत असे म्हटले जाते. पण गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशा भोसले यांनी ही म्हण खोटी करून दाखवली. लता मंगेशकर यांच्या एवढीच लोकप्रियता आशा भोसले (Asha Bhosle) यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मिळवली. किंबहुना सर्वसाधारण फॅन्सचा विचार करता अनेक वेळा लता मंगेशकर यांच्या पेक्षाही जास्त फॅन्सची संख्या आशा भोसले (Asha Bhosle) यांना लाभली होती. संपूर्ण मंगेशकर घराणेच गुणवत्तेने भरलेले आहे आणि या मंगेशकर भावंडांपैकी प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. लता मंगेशकर या तर गान सरस्वती होत्या. आशा भोसले यांनी जाणीवपूर्वक आपली वेगळी अशी शैली निर्माण केली होती. लता मंगेशकर सहसा ज्या प्रकारची गाणी गाऊ शकत नव्हत्या अशा उडत्या चालीच्या गाण्यांवर आशा भोसले यांनी जास्त मेहनत घेऊन त्यामध्ये आपली मक्तेदारी तयार केली होती. अर्थात, आपल्या या गायकीवरील हा शिक्काही त्यांनी काळाच्या ओघात पुसून टाकला होता. त्यांचे पती आरडी बर्मन यांच्या संगीत निर्देशनाखाली त्यांनी अत्यंत सुंदर अशी गाणीसुद्धा रसिकांना दिली आहेत. Asha Bhosle Death: उडत्या चालींच्या गाण्याव्यतिरिक्त गझल, भावगीत, भक्तिगीत अशी अनेक प्रकारची गाणी आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये गायली. वैयक्तिक आयुष्याचा विचार करता आशा भोसले यांना जरी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला तरी त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीवर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. संगीत क्षेत्रातील सर्वच दिग्गजांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे लता मंगेशकर यांनी आयुष्यात कधीही ज्या ओ पी नय्यर यांच्यासारख्या संगीतकारांकडे गाणे गायले नाही त्याच नय्यर यांच्याकडे आशा भोसले यांनी अत्यंत सुंदर गाणी गायली. चित्रपट सृष्टीतील कोणताही संगीतकार आशा भोसले यांना नाकारत नव्हता. ‘उमराव जान’ या चित्रपटामधील खय्याम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेली भोसले यांची गाणी म्हणजे त्यांच्या संगीत कारकिर्दीतील मानाचा तुरा आहे. याच गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘इजाजत’ सारख्या चित्रपटांमध्ये ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ यासारखे अवघड गाणे गाऊन अशा भोसले यांनी एक अमीट ठसा उमटवला होता. अशी हजारो गाणी आजही रसिकांच्या तोंडी आहेत ज्यामध्ये आशा भोसले (Asha Bhosle) यांनी कधी रसिकांना डोलायला लावले, तर कधी गुणगुणायला लावले, तर कधी विचार करायला भाग पाडले आहे. त्यांच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरली असल्याने चांगला संगीतकार मिळाला की त्यांच्यातील ही गुणवत्ता बाहेर येत असे आणि एक अत्यंत लँडमार्क असे गाणे तयार होत असे. वैयक्तिक आयुष्यामध्येही त्या सर्व अनुभव घेत जगल्या. स्वयंपाकाची आवड असणार्या आशाताईंनी त्यांच्या या आवडत्या व्यवसायामध्येसुद्धा पदार्पण केले होते. 2000च्या पहिल्या काही वर्षांमध्ये त्यांनी दुबईमध्ये ‘आशाज’ नावाने रेस्टॉरंट सुरू केले होते. आज त्याची साखळी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ‘माई’ नावाच्या एका चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयही केला होता. वयाच्या 90 वर्षांपर्यंत त्या स्टेजवर गात होत्या. आशाताईंकडे आठवणींचा खजिना असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचे भाषण ऐकणे हा एक मोठा अनुभव असायचा. साहजिकच त्यांचा वाढदिवस असो किंवा त्यांना मिळालेल्या मोठ्या पुरस्काराबद्दल त्यांनी दिलेले उत्तर असो, त्यांची वेगळी वकृत्व शैलीही प्रभाव पाडत असे. दादासाहेब फाळके, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण असे मोठे पुरस्कार मिळवूनही आशाताई शेवटपर्यंत जमिनीवरच राहिल्या. त्यांच्या अष्टपैलू गायकीसाठी संगीत क्षेत्रातही अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले. 1970 च्या दशकामध्ये आशा भोसले यांनी गायलेले ‘दम मारो दम’ हे गाणे आज इतक्या वर्षानंतरसुद्धा तेवढेच लोकप्रिय आहे. त्यांची अशी अनेक गाणी आहेत जी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालत असतात. देशातील अनेक भाषांमध्ये लिलया गाणी गाणार्या या महान गायिकेने आपले मराठीपण कधीच सोडले नाही हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे हा अष्टपैलू सूर जरी लयाला गेला असला तरी गेल्या 80 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे प्रचंड काम करून ठेवले आहे त्यानिमित्ताने त्यांचा स्वर आकाशात कुठे ना कुठे सतत ऐकला जाईल. या अष्टपैलू गायिकेला आदरांजली.